www.24taas.com, शुभांगी पालवे
स्क्रीप्ट रायटर, झी मीडिया
सिनेमा : द लन्च बॉक्स
दिग्दर्शक : रितेश बत्रा
कलाकार : इरफान खान, इरफान खान, निर्मत कौर, नवाझुद्दीन सिद्दीकी
खऱ्या अर्थानं ‘अडल्ट मुव्ही’ (वल्गर नाही) म्हणजेच ‘मॅच्युअर’ म्हणावा असा हा चित्रपट... मुंबईच्या भाऊगर्दीत एका सरकारी कार्यालयातील अकाऊन्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारा साजन फर्नांडीस (इरफान खान) आणि एक कर्तव्यदक्ष गृहिणी ईला (निर्मत कौर) यांचा काहीही संबंध नसताना अचानक जुळून आलेला संवाद... आणि त्यांतून उलगडत गेलेलं त्यांचं आयुष्य... हे सिनेमाचं कथानक. न बोलताही बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहचणाऱ्या अनेक गोष्टी चित्रपटात पाहायला मिळतात.
काय आहे कथानक
निर्मत कौरचा हा पहिलाच सिनेमा... पण, प्रेक्षकांना कोणत्याही क्षणी ती आपला नवखेपणा जाणवून देत नाही. मध्यमवयीन ईला नवरा राजीव आणि मुलगी यशस्वीसोबत आपलं बेचव आयुष्य जगतेय. नवऱ्याची बाहेर भानगड आहे हे तिला माहित आहे. पण, तरिही त्याला आनंदी ठेवण्यासाठी तिचे नानातऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण बनवून धाडण्याचा देशपांडे काकूंनी दिलेला सल्ला अंमलात आणण्याच्या प्रयत्नात तिचा अनोळखी साजनशी संवाद सुरू होतो.
साजन हा वयाच्या उत्तरार्धाकडे झुकलेला सरकारी अधिकारी... निवृत्ती स्विकारून नाशिकला स्थिरस्थावर होण्याचे बेत आखून तयार आहे. पत्नीचा अगोदरच मृत्यू झालेला. त्यामुळे आपलं बेचव आयुष्य एकाकीपणे पण न कुढता स्वत:च्या पद्धतीने जगणारा... ३५ वर्षांच्या काळात एकही चूक न करणारा... पण, एकलकोंडा साजन लोकांच्या लेखी काही विक्षिप्त.
साजन ऑफिसमधून रिटायर झाल्यानंतर त्यांच्याजागी एका नवीन कर्मचाऱ्याची शेखची (नवाझुद्दीन सिद्दीकी) भरती केली गेलीय. त्याला ट्रेन करण्याची जबाबदारी साजनवर आहे.
सिनेमाच्या सुरुवातीला सुरू झालेलं ईलाची आणि साजनचं आयुष्य चित्रपट संपतानाही तसंच सुरू राहिलंय... पण आयुष्य जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र दोघांचाही बदललाय. कधी कधी चुकीची गाडीही योग्य जागेवर पोहचते, सांगत आशेचा किरण दाखवणारी ही एक कथा...
चित्रपटातील खास...
ईलाच्या वरच्या खोलीत राहणाऱ्या देशपांडे काकू, शेखची होणारी बायको, ईलाची आई, मुलगी, नवरा हे सगळे ‘साईड कॅरेक्टर्स’ या कथेतील वेगळा भाग मात्र अजिबात वाटत नाहीत. ही कथा सांगण्यासाठी ते तिथे हवेच आहेत, अन्यथा कथा कशी पुढे सरकणार, असं प्रेक्षकांना वाटायला लावणारे... उगाचच केली जाणारी सरमिसळ, नकोशी वाटणारी गाणी आणि म्युझिकच्या बॅकग्राऊंडवर उगाच निर्माण केला जाणारा ‘सिरियसनेस’ यांच्या प्रेमात हा सिनेमा पडलेला नाही.
एका महिलेनं आपल्या मुलीला घेऊन बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं समजल्यानंतर ऑफिसमध्ये काही दिवसांपासून नेहमी येणाऱ्या डब्याची कावराबावरा होऊन वाट पाहणारा साजन काय... किंवा, लग्न झालेल्या मुलीकडून पैसे कसे घेणार? म्हणून मुलगा हवा होता असं म्हणताना नातीला कुरवाळणारी ईलाची आई काय... प्रत्येक गोष्ट संवादांपेक्षा अधिक काहीतरी सांगताना दिसते.
दिग्दर्शन
दिग्दर्शक म्हणून रितेश बत्रा यांचा हा पहिलाच प्रयत्न... पण, पहिल्याच प्रयत्नात त्यांनी आपलं अस्तित्व बॉलिवूडला ठळ्ळकपणे दाखवून दिलंय. प्रत्येक गोष्टी सांगूनच समजावली पाहिजे असं नाही तर न सांगताही प्रेक्षकांसमोर अनेक गोष्टी मांडता येतात, हे त्यांनी या चित्रपटातून दाखवून दिलंय.
डब्यात मेहनत घेऊन बनविलेली गवारीची भाजी असो किंवा नुसताच रिकामा डबा... प्रत्येक वस्तू काहीतरी जाणवून देण्याचा प्रयत्न करतात. देशपांडे काकू (भारती आचरेकर) दिसत नसतानाही त्यांच्या आवाजातून त्यांचं अस्तित्वही तितक्याच ठळ्ळकपणे जाणवतं.
पुरस्कार
कान्स फिल्म फेस्टीव्हल २०१३ मध्ये पहिल्यांदा या सिनेमाचं स्क्रिनिंग पार पडलं होतं. यावेळी ‘क्रिटिक विक व्हिवर्स चॉईस अॅवॉर्ड’ या सिनेमानं पटकावलं होतं. भारतात, यूएस आणि यूकेमध्ये मात्र या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झालाय.
का पाहावा...
प्रेमाची एक झुळूकही व्यक्तीनं स्वत: निरर्थक ठरवलेलं आयुष्य वेगळ्या पद्धतीनं त्याच्यासमोर मांडताना पाहायचं असेल, तर ‘लंच बॉक्स’ पाहावा... उत्तम दिग्दर्शनाचा आणि उत्तम अभिनयाचा नमुना पाहायचा असेल तरीही तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
•