‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’...साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दसरा सर्वांना आनंदाची अनुभूती देतो. आजच्या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजीतापूजा आणि शस्त्रपूजा केली जाते. वह्या, पुस्तकं, ग्रंथ, पोथ्या, यंत्र, शस्त्र हत्यारं यांची पूजा करण्यासोबत आपट्याची पानं सोनं म्हणून लुटण्याची परंपराही आहे. आजच्याच दिवशी जुने भांडण, तंटे विसरून चांगल्या विचारांचं आदान प्रदान केलं जातं. हीच त्यामागची उद्दात्त भावना आहे.
आपला देश कृषीप्रधान देश असल्यानं पावसाळ्यात पेरणी केलेलं शेतातील पहिलं पीक याच दिवशी घरात आणण्याची प्रथा आहे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी नऊ धान्यांची पेरणी केली जाते. आणि दस-यांच्या दिवशी या धान्याचे अंकुर उपटून देवीला वाहतात. दसरा हा विजयाचा सण आहे तो विजयोत्सव आहे. शौर्याचं प्रतिक असलेली विजयादशमी मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होतीय. झेंडूच्या फुलांची आरास घराघरात केली जाते.
विशेष म्हणजे आजच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचीही परंपरा आहे. महागाईनं जरी सगळ्यांना बेजार केलं असलं तरी सोनं खरेदीचा उत्साहही कमी झालेला नाही प्रथेनुसार किमान 1 ग्रॅम सोनं का होईना ग्राहकांची पावलं सोने व्यापा-यांच्या दुकानाकडे वळतातच...अशा या आनंददायी सणाच्या आपल्या आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा....