www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
सुचित्रा सेन. बंगाली आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणा-या या अभिनेत्रीनं आपल्या सदाबहार अभिनयाचा एक अनोखा अंदाज पडद्यावर नेहमीच हटके पेश केला...दादासाहेब फाळके पुरस्कारसाठी त्यांची निवड झाली असतांना सार्वजनिक कार्यक्रम नको, असं म्हणत राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणारा फाळके पुरस्कार स्विकारण्यासही त्यांनी नम्रपणे नकार दिला.
सुचित्रा सेन...एका बंगाली कुटुंबात जन्मलेल्या सुचित्रा सेन यांचं मूळ नाव रमा दासगुप्ता..६ एप्रिल १९३१ रोजी बांगलादेशातल्या पब्ना या छोट्याशा गावात जन्म झालेल्या सुचित्रा सेन यांचे वडील तिथल्याच शाळेत हेडमास्टर होते. तर आई गृहिणी...वडील शिक्षक असल्याने घरातच वेगवेगळ्या विचारांची देवाणघेवाण असे. अशा वातावरणात वेगळं काही करून दाखविण्याची उर्मी येणार नाही तरच नवल..सुचित्राने पहिली बंगाली फिल्म साईन करत एका वेगळ्या आणि त्याकाळी तितक्याच धाडसी वाटणा-या चंदेरी दुनियेच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.
नातेवाईकांचे टप्पेटोमणे होतेच, मात्र घरचा सपोर्ट कामी आला आणि सुचित्राचा आत्मविश्वास वाढत गेला. दुर्दैवाने पहिली फिल्म रिलीज झालीच नाही. मात्र त्यानंतर बंगालमधील प्रसिद्ध अभिनेते उत्तमकुमार यांच्यासोबत सुचित्राची फिल्म आली शेष कोठाई... आणि या जोडीची ही पहिलीच फिल्म सुपरहिटही ठरली....करिअरची गाडी जोरात धावत असतानाच १९४७ मध्ये या बंगालवासीयांच्या लाडक्या ब्युटी क्वीनने आदीनाथ सेन या बंगाली बिझिनेसमनशी विवाह केला.
विशेष म्हणजे लग्नानंतरही सुपरहिट फिल्मचा सिलसिला सुरुच राहिला. एवढंच नाही तर १९५७ मध्ये मुसाफिर या हिंदी फिल्मद्वारे या बंगाली ब्युटीने बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली.१९६० मध्ये देवानंदबरोबरचा बंबई का बाबू. संजीवकुमारबरोबरचा आँधी, देवदास अशा काही फिल्म्सनी हिंदी बॉक्स ऑफिसवरही मोठं यश मिळवलं. पुढे मुनमुन सेन या त्यांच्या मुलीनंही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत अनेक फिल्म्स केल्या. मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये सात पाके बंध या फिल्ममधल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी पहिली बंगाली अभिनेत्री होण्याच मान सुचित्रा सेन यांना मिळाला. तर बंगालचा सर्वोच्च बंगा विभूषण या पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आलाय.
१९७८पासून मात्र या दिलखुलास अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीपासून स्वतःला ठरवून बाजूला केलं. कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात येणं त्या प्रकर्षानं टाळत. एवढंच नाहीतर २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार होतं. मात्र आता सार्वजनिक कार्यक्रम नको, असं म्हणत राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणारा फाळके पुरस्कार स्विकारण्यासही त्यांनी नम्रपणे नकार दिला....एकूणच १९५५ ते १९७८ पर्यंत या निखळ आणि तितकच लोभस सौंदर्य लाभलेल्या या बंगाली ब्युटीनं बंगाली सिनेमा आणि बॉलिवूडमध्ये आपला एक वेगळा अंदाज आणि बाज कायम राखला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.