www.24taas.com,मुंबई
मुंबईच्या किना-यांवर आणि परिसरातील समुद्रावर आता तीन रडारांची नजर असणार आहे. तारापूरचे दीपगृह, अलिबागजवळील कान्होजी आंग्रे बेट आणि कोर्लई दीपगृह या ठिकाणी रडार उभारण्यात आलेत. यासंदर्भात रडार उभारणा-या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपंनीच्या अधिका-यांनी ही माहिती दिली.
२००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर कोस्टल रडारची संकल्पना पुन्हा एकदा जोर धरु लागली. देशाची किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी दोन टप्प्यात किना-यांवर रडार उभे करण्याचे नक्की करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ४६ रडार उभारण्यात आले असून सप्टेंबर २०१२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. सुमारे ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
दुस-या टप्प्यात आणखी ३६ रडार उभे करण्यात येणार. पहिल्या टप्प्यात राज्यात पाच रडार उभे करण्यात आली असून तारापूरचे लाईट हाऊस, कान्होजी आंग्रे बेट( खांदेरी किल्ला ), कोर्लई, टोकेश्वर ( दाभोळ) , देवगड अशा पाच ठिकाणी रडार उभारण्यात येणार आहेत.
या सर्व रडारांमधून येणारी माहिती चार Remote Operation Centres मध्ये मुंबई, गांधीनगर, चेन्नई आणि अंदमान निकोबर या ठिकाणी जमा होईल. दिल्लीमध्ये या सर्व यंत्रणेचे मुख्य केंद्र असेल. या रडारांमुळे साधारण ६० किमीचा परिसर हा नजरेखाली येतो.
तसंच रडार टॉवरवर असलेल्या शक्तीशाली कॅमे-यामुळे वातावरण स्वच्छ असेल तर साधारण २८ किमी पर्यंत दूरवर मोठ्या जहाजांवरर थेट लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे समुद्रातील हलचाली टीपण्यास चांगली मदत होणार आहे.
प्रत्येक रडारवर वातावरणाची माहिती देणारे संवेदके असणार आहेत, यामुळे त्या भागात असलेल्या वातावरणाच्या परिस्थितीची माहिती मुख्य केंद्राला मिळण्यास मदत होणार आहे.