महाराष्ट्राचा नवा सिंघम!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ आलंय... ते वादळ ज्यांच्यामुळं आलंय त्या व्यक्तीचं नाव आहे विजय पांढरे... राज्याच्या सिंचनातील भ्रष्टाचार आणि अनागोंदीवर त्यांनी बोट ठेवलं आणि त्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं. पण कोण आहेत हे पांढरे? त्यांनी सिंचन खात्यावर कोणते आक्षेप घेतलेत? आध्यात्माशी काय आहे पांढरेंचं नातं? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत ‘महाराष्ट्राचा नवा सिंघम!’ या झी २४ तास स्पेशलमध्ये…

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 26, 2012, 10:25 PM IST

www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ आलंय... ते वादळ ज्यांच्यामुळं आलंय त्या व्यक्तीचं नाव आहे विजय पांढरे... राज्याच्या सिंचनातील भ्रष्टाचार आणि अनागोंदीवर त्यांनी बोट ठेवलं आणि त्यानंतर सगळं चित्रच बदलून गेलं. पण कोण आहेत हे पांढरे? त्यांनी सिंचन खात्यावर कोणते आक्षेप घेतलेत? आध्यात्माशी काय आहे पांढरेंचं नातं? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत ‘महाराष्ट्राचा नवा सिंघम!’ या झी २४ तास स्पेशलमध्ये…

विजय पांढरेंनी एक अशी बाब उघड केलीय ज्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना राजीनामा द्यावा लागलंय, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय आणि तो सहाजीकच आहे कारण अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे राज्य सरकारलाच घरघर लागलीय. अजित पवार... महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बड नावं... राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्यांची पकड मजबूत आहे... आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत... राजकारणात आजपर्यंत त्यांनी अनेकांना शिंगावर घेण्यास मागेपुढे बघितलं नाही... पण अखेर अजित पवारांवरही मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आलीय आणि त्याला कारणीभूत ठरलेत मुख्य अभियंता विजय बळवंत पांढरे...
गेल्या काही दिवसांपासून या एकाच नावाची राज्यात चर्चा होतेय. कारण राज्याच्या राजकारणात या एका नावामुळे मोठी उलथापालथ झालीय. पांढरे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यात जणू राजकीय वादळचं आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. राज्यात सुरु असलेल्या जलसिंचन प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत पांढरे यांनी आपल्या पत्रांच्या माध्यमातून सावध करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांवर कारवाई काही झाली नाही. उलट त्यांना गप्प राहण्याचा सल्ला देण्यात आला. अधिकारी पातळीवर कोणीच दाद देत नसल्यामुळं पांढरेंनी या प्रकरणाची जाहीर वाच्यता केली. पांढरेनी राज्यपालांना पत्र लिहून तक्रार केली. तसेच राज्यातील जलसिंचन प्रकल्पात सुरु असलेल्या अनागोंदीचा पाढाच त्यांनी वाचला. त्यामुळे जलसिंचन खात्यातील छुपा कारभार जगासमोर आला. प्रसिद्धी माध्यमांनी हे प्रकरण लावून घरल्यानंतर सरकारवर दबाव वाढत गेला आणि अखेर अजित पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली. अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे विजय पांढरे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेत.

काय होतं पांढरेंच्या अहवालात...
गोसीखुर्द, तारळी आणि तापी निम्न या जलसिंचन प्रकल्पांच्या कामावर विजय पांढरे यानी शास्त्रशुद्ध अहवाल देत सर्वांवरच कोरडे ओढले. सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या नेत्याना आता मात्र पांढरेच्या प्रत्येक शब्दाची भीती वाटू लागली. जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाराला विजय पांढरेंनी वाचा फोडल्यानंतर त्यांच्यावर आरोप होणार हे उघडच होतं. कारण त्यांनी वादळ अंगावार ओढावून घेतलं होतं. सरकारी नोकरीत राहून त्यांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीलाच आव्हान दिलं होतं. विशेष म्हणजे आघाडी सरकारमधील वजनदार नेत्याच्या कार्यशैलीवरच त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पांढरेवर आरोप होणं सहाजिकचं होतं. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी तर त्यांना थेट मनोरुग्ण ठरविण्यापर्यंत मजल मारली. जलसंपदा विभागाच्या विविध तांत्रिक सल्लागार समितीवर कार्यरत असलेल्या एका उच्चपदस्थ आणि जबाबदार अधिकाऱ्यावर अशा पद्धतीने टीका करण्यात आली होती. पण, त्या टीकेमुळे विजय पांढरे काही मागे डगमगले नाहीत. तसेच अध्यात्मात रुची असल्यामुळे त्यांनी आपला संयमही सोडला नाही. गोसीखुर्द, तारळी आणि तापी निम्न या जलसिंचन प्रकल्पांच्या कामाच्या दर्जाविषयी पांढरे यांनी सवाल उपस्थित केला. तसेच आपला हा दावा शास्त्रीय चाचण्यांवर आधारीत असल्याचं त्यांनी सांगितलंय. एकीकडं विजय पांढरे यांनी शास्त्रशुद्ध अहवालाच्या आधारे आरोप केले आहेत तर दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्याचा प्रतिवाद करतांना पांढरेंच्या प्रश्नांना उत्तर देण्यऐवजी विषय भरकटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पांढरे यांनी ज्या शास्त्रीय अहवालाचा उल्लेख आपल्या पत्रात केला आहे त्यावर मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांकडं कोणतच उत्तर नाही. खुद्द अजित पवारांनीही राजीनाम्याची घोषणा करताना पांढरेंच्या आरोपाविषयी कोणताच खुलासा केला नाही हे विशेष.