पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यान गेलं चोरीला!

विहीर चोरीला गेल्याचा किस्सा कदाचित आपण चित्रपटात पाहिला असेल....पिंपरी चिंचवडमध्ये विहीर नाही, पण उद्यान चोरीला गेलंय....ऐकून दचकलात! पण, असाच किस्सा घडलाय...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 11, 2012, 07:43 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
विहीर चोरीला गेल्याचा किस्सा कदाचित आपण चित्रपटात पाहिला असेल....पिंपरी चिंचवडमध्ये विहीर नाही, पण उद्यान चोरीला गेलंय....ऐकून दचकलात! पण, असाच किस्सा घडलाय...
पिंपरी-चिंचवडच्या नेहरू नगरमध्ये प्रभाग क मधील सावित्रीबाई फुले नाना नानी पार्क....या उद्यानासाठी आणि याच ठिकाणी असलेल्या कापसे व्यायाम शाळेसाठी पालिकेनं २००८ पासून लाखो रुपये खर्च केले. एका खासगी संस्थेला पाच वर्षांसाठी प्रती महिना ४४८५ रुपये या उद्यानाच्या केवळ देखभाली साठी देण्यात आलेत. पण या उद्यानाची अवस्था पाहिलीत, तर त्यावर एवढा खर्च होऊनही या उद्यानाची एवढी दुरवस्था का, असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
आरटीआय कार्यकर्ते ईश्वर कांबळे यांनी माहितीच्या अधिकारात पालिकेच्या उद्यान विभागाला या खर्चाबाबत आणि उद्यानाच्या दुरवस्थेबाबत विचारलं असता, पालिकेकडून अत्यंत धक्कादायक उत्तर मिळालं.
या सगळ्या धक्कादायक प्रकारावर पालिकेचे अधिकारी मात्र बोलायला तयार नाहीत. पालिकेच्या म्हणण्या नुसार नेहरूनगरमध्ये हे उद्यानच नाही. तर मग पालिकेनं या उद्यानासाठी लाखो रुपये खर्च केलेच कसे, असा सवाल आता विचारला जातोय. आता पालिकेचं हे उद्यान आता चोरीला गेलं की काय...अशी रंगतदार चर्चा आता सुरू झाली आहे.