www.24taas.com, मुंबई
समुद्र किनारा असो की एखादं छोटं गाव...घोडागाडी तुम्हाला दिसणारच..कुठ पर्यटकांना सैरसपाटा मारण्यासाठी तिचा वापर होतो तर कुठं प्रवासासाठी वाहतूकीचं साधन म्हणून घोडागाडी वापरली जाते...पण त्या घोडागाडीला जुंपलेल्या घोड्याची काय अवस्था असते याचा कुणीच विचार करत नाही..त्यामुळेच या रुबाबदार प्राण्याची दुर्दशा झालीय...
व्हिक्टोरीया अर्थात घोडागाडी..... आलिशान कार्स आणि बाईकसच्या युगातही घोडागाडीचं आकर्षण जराही कमी झालं नाही... दक्षिण मुंबईत आजही मौज म्हणून घोडागाडीतून रपेट मारण्यासाठी पर्यटक अवर्जून येतात...समुद्र किना-यापासून ते लहान-मोठ्या गावात आजही टांगा हे वाहतूकीचं साधन आहे..अगदी रिक्षा टॅक्सीच्या जुगातही टांग्याच अस्तित्व टिकून आहे...लोक घोडागाडीतून मोठ्या हौशेने मजेची सफर करतात... पण त्या गाडीला जुंपलेल्या घोड्याची अवस्था पाहण्यास कुणाला वेळ नसतो...ते मुकं जितराब वर्षानूवर्ष मुकाटपणे सेवा करतं...पण त्याच्या बदल्यात ना त्याला पोटभर चारा मिळतो ना डोक्यावर छत असतं ना त्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाते... केवळ ढोर मेहनतच त्याच्या नशिबी असते...
मुंबईत नरिमन पॉईंट, कफ परेड, सीएसटी, दादर चौपाटी, सहार विमानतळ, अंधेरी, वर्सोवा लिंक रोड,गोराई, मालाड, मनोरी या परिसरात घोड्यांच्या पागा आहेत. पण त्यांना पागा म्हणावं का ? हाच खरा प्रश्न आहे...कारण अत्यंत लहान आणि गलिच्छ ठिकाणी घोड्यांना बांधलं जातं. त्यांच्या मलमुत्राचा निच-याची कोणतीच व्यवस्था केलेली नसते..तशाच परिस्थितीत त्यांना चारा दिला जातो.
घोड्याला नियमीतपणे खरारा केला जातो पण इथं खरारा दूरच त्यांच्या आरोग्याची कोणतीच काळजी घेतली जात नाही..घोड्यांना होणा-या जखमांकड दुर्लक्ष केलं जातं...नाल ठोकतांना पैशाकडं बघीतलं जातं आणि त्याचा शारीरिक त्रास मात्र घोड्यांना सहन करावा लागतो...या छायाचित्रातून त्याची दाहकता तुमच्या लक्षात येईल..या सगळ्या पार्श्वभूमीवर प्राणी मित्र संघटांनी आवाज उठवला आहे.
घोडागाडीच्या ओझ्यातून घोड्यांची सुटका व्हावी यासाठी त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली आहे..घोड्यांचं अनारोग्य आणि मालकांचे दुर्लक्ष याविषयी ही जनहित याचिकेत दाखल करण्यात आलीय..उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून येत्या १५ जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे.
आज मुंबई आणि उपनगरांमध्ये ३७१ पागा आहेत..पण त्यापैकी बहुतेक ठिकाणची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. खरं तर घोडागाडीच्या परवान्याचं नुतनीकरण करतांना जिल्हा पशुवैद्यकीय अधिका-याकडून घोडा शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का ? याची पहाणी केला जाते..तसेच वाहतूक पोलिसांकडूनही परवानगी घेणे अवश्यक असते. मुंबईत नवीन घोडागाडीला परवानगी दिली जात नाही. केवळ जुने परवान्यांच नुतनी करण केलं जातंय. मुंबईत १३० घोडागाडी आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी त्याचा वापर केला जात नाही..मात्र टूरिस्ट वाहन म्हणून घोडागाडीचा वापर केला जातो.
घोडागाडी चालवण्याऱ्यांची उपजिवीका या व्यवसायावर अवलंबून असला तरी घोड्यांचा हा छळ किती दिवस होत राहणार असा सवाल प्राणी मित्र संघटनांकडून केला जात आहे.