www.24taas.com, मुंबई
कॅगचा अहवाल झी 24 तासच्या हाती लागलाय. या अहवालात अनेक मंत्र्यांचे बुरखे फाटले आहेत. मंत्र्यांनी जमीनी आणि फ्लॅट्स लाटल्याचं या अहवालातून उघ़ड झालंय.
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला नऊ कोटींची जमीन नऊ लाखांना देण्यात आलीय. विशेष म्हणजे वित्त सचिवांनी हरकतीचा शेरा मारल्यानंतरही ही जमीन देण्यात आल्याचं कॅगनं आपल्या अहवालात नमूद केलंय.
संसदीय कामकाज आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी फ्लॅट लाटल्याचं पुढं आलंय. त्यांच्या पत्नीच्या नावानं आशीर्वाद सोसायटीत फ्लॅट असतानाही त्यांनी स्वत:च्या नावानं राजयोग सोसायटीत फ्लॅट घेतला असून ते या सोसायटीचे चिफ प्रमोटरही आहेत.
नारायण राणेंच्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळावरही कॅगनं ताशेरे ओढलेत. या संस्थेला शैक्षणिक कार्यासाठी कम्युनिटी सेंटर उभारण्यासाठी 22 सप्टेंबर 1999 साली 1500 चौरस मीटर जागा देण्यात आली होती. त्याचबरोबर 26 मे 2004 साली 169.5 चौरस मीटर जागा देण्यात आली होती.
मात्र कुठल्याही शैक्षणिक कार्यासाठी या जागेचा वापर झालेला नाही. अंधेरीतील या जागेत सिंधुदुर्ग भवन या नावाची इमारत उभी आहे. मात्र इथं प्रदर्शनं, वेगवेगळे उपक्रम आणि परिषदांसाठी हॉल बांधण्यात आलेत. इथं शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोयही आहे. या हॉलचं दिवसाचं भाडं 2 लाख रुपये आहे. शिवाय इथं डीजे आणि बारही चालवला जातोय.
[jwplayer mediaid="77411"]