www.24taas.com, मुंबई
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्थानकाजवळ ‘साबरमती एक्सप्रेस’च्या 'एस-६' बोगीला लावलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला आणि दुसऱ्याच दिवसापासून सुडाच्या आगीनं गुजरात पेटलं.
साबरमती एक्सप्रेसला आग लावली कोणी आणि त्याची शिक्षा देत कुणाला आहोत, याचंही भान या दंगलखोरांना झालं नाही. दंगलीत शेवटी व्हायचं तेच झालं....हजाराहून अधिक निरपराधांना आपला जीव गमावावा लागला..
गुलबर्ग सोसायटी
गुजरात दंगलीची सर्वाधिक झळ बसली ती अहमदाबाद शहराला आणि त्यातही प्रामुख्यानं ‘गुलबर्ग सोसायटी’ला. संपूर्ण सोसायटी दंगलखोरांनी जाळून टाकली. दंगलखोरांच्या तावडीतून काँग्रेसचे माजी आमदार एहसान जाफरीदेखील सुटले नाहीत. त्यांची पत्नी जाकिया जाफरी न्यायालयीन लढाई लढतायत खऱ्या, मात्र दहा वर्षानंतरही दोषी अजून मोकाटच फिरत आहेत.
गुजरातमधल्या धार्मिक दंगलीला मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी अनेकवेळा केला. दंगली रोखण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असतानाही मोदी त्यावेळी काय करत होते? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात येतो. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनींही मोदींना राजधर्माची आठवण करुन दिली होती. मात्र एवढं असलं तरी मोदींविरोधात कोणतेही पुरावे विरोधकांकडं नाहीत.
गुजरात दंगलीनंतर गेल्या १० वर्षात इथलं राजकारण मोदीकेंद्रीत झाल्याचं दिसून येतं. ‘विनाशपुरुष’ ते ‘विकासपुरुष’ अशी प्रतिमा तयार करण्यात त्यांना गुजरातमध्ये यश आलं असलं तरी, राष्ट्रीय राजकारणात मात्र त्यांच्या कारकिर्दीतील २००२ ची दंगल त्यांना त्रासदायक ठरत आहे.
जगाला शांततेचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या गुजरातमध्येच देशातील सर्वात मोठी दंगल २००२ मध्ये झाली. गांधींच्या भूमीतलं हे दुर्देवच. या हिंसक घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली असली तरी त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. मात्र या दंगलीनंतरच्या या १० वर्षांतच खऱ्या अर्थानं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाला उभारी मिळाली आणि ‘गुजरात म्हणजेच मोदी’ असं समीकरणं रुढ झालं. दंगलीनंतर झालेल्या दोन्ही वेळच्या निवडणुकीत गुजरातची सत्ता आपल्याच हातात ठेवण्यात त्यांनी यश मिळवलं.
राष्ट्रीय नेते?
गुजरातला विकासाच्या नव्या वाटेवर नेऊन स्वत:ची विकासपुरुष ही प्रतिमा त्यांनी बनवली खरी, मात्र २००२ च्या दंगलींमुळे विनाशपुरुष हा डाग जो त्यांच्या प्रतिमेवर पडला तो काही केल्या जायला तयार नाही आणि कदाचित यापुढेही जाणार नाही. गुजरातपुरता त्यांना या दंगलीनं हात दिला असला तरी जेव्हा त्यांचा राष्ट्रीय नेते म्हणून उल्लेख होऊ लागतो, त्या त्यावेळी या दंगलीचं भूत मोदींच्या मानगुटीवर येऊन बसतं.
म्हणूनच बिहारचे मुख्यमंत्री नितीनकुमारांनी त्यांना प्रचारासाठी राज्यात येऊ दिलं नाही. दंगलीदरम्यान दंगलखोरांना मोकाट सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी दिल्याचे आरोप आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी केल्यानंतर मोदींची प्रतिमा पुन्हा डागाळली गेली.
कट्टर हिंदुत्ववाद्यांना नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य असलं, तरी ‘एनडीए’चं कडबोळं आणखी मजबूत करण्यासाठी सर्वसमावेशक असलेला चेहरा नरेंद्र मोदी होऊ शकत नाहीत. हेही तितकंच खरं.