www.24taas.com, मुंबई
बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसण्याची शक्यता आयपीसीसीनं व्यक्त केलीय. मुंबईची भौगोलिक परिस्थिती, वाढती लोकसंख्या आणि पर्यावरणाबाबत प्रशासनाची दुटप्पी भूमिकाच याला कारणीभूत ठरली आहे.
मुंबईभोवती तिनही बाजूंनी समुद्रकिनारा असल्यानं सध्या ग्लोबल वॉर्मिगचा सर्वाधिक धोका आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राचा स्तर दरवर्षी १ ते २ मिलीमीटरनं वाढतोय. अशीच स्थीती राहिल्यास येत्या काही वर्षात किना-यालगतच्या भागात समुद्राचं पाणी घुसलेलं चित्र पहायला मिळेल. मात्र याकडे सर्रासपणे डोळेझाक करून उंच इमारती उभारल्या जातायेत. दुसरीकडे समुद्रात भराव टाकून मुंबईच्या सात भागांना जोडण्यात आलय. त्यामुळे थोडासा पाऊस झाल्यानंतरही अनेक भागांत पाणी भरण्याचं प्रमाण वाढलंय.
या कारणांप्रमाणेच खारफुटीची झाडं कमी झाल्यानं मुंबईला समुद्राच्या पाण्याचा धोका वाढलाय. जवळजवळ ८० टक्के खारफुटी लँडमाफियांनी नष्ट केलीय. आता केवळ ३५ स्क्वेअर किलोमीटर भागात खारफुटी शिल्लख राहिलीय. मुंबईला पुरापासून वाचवणारे अनेक प्रोजेक्ट अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे शहरातली ६० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टी भागात राहणारी आहे. त्यामुळं कोणतीही मोठी आपत्ती आल्यास त्याचा फटका या लोकांना आधी आणि इतरांना नंतर बसेल.
एकूणच ही परिस्थीती पाहता मुंबईला वाचवायचं असेल तर आधी पर्यावरणाचं रक्षण करणं गरजेचं आहे.