झी २४ तास वेब टीम, पुणे
म्हाडाच्या खराडी प्रकल्पाच्या लाभार्थींची घराची प्रतीक्षा अजून संपलेली नाही. गेली सात वर्ष हे लोक घराचा ताबा मिळवण्यासाठी म्हाडाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र म्हाडा प्रशासन त्यांन फक्त नवी तारीख देत आहे. PMPL मध्ये बस ड्रायव्हर असलेले मुरलीधर मोरे. गेली अनेक वर्ष ते स्वतःच्या घराचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना म्हाडाच्या घरकुल योजनेमध्ये घरही लागलं. त्यांनी २००४ साली बुक केलेलं घर सात वर्षं उलटून गेली तरीही त्यांना मिळालेलं नाही. मुरलीधर मोरे यांच्यासारख्या दोनशे जणांना अजून घराचा ताबा मिळालेला नाही.
साडे तीनशेपेक्षा जास्त घरांचा समावेश असलेला म्हाडाच्या प्रकल्पाचं काम अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी झी २४ तासनं ही बातमी दाखवली होती, त्यावेळी ३० ऑक्टोबर २०११ पर्यंत सगळ्यांना घरांचा ताबा मिळेल, असं आश्वासन म्हाडानं दिलं होतं. मात्र ही मुदत केव्हाच उलटून गेली आहे. घराचं स्वप्न बाळगून असलेल्या अल्प उत्पन्न गटातले लोक लाभार्थी ठरण्याऐवजी प्रकल्पग्रस्त ठरले आहेत.
कंत्राटदाराकडून झालेली दिरंगाई, महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्राला झालेला उशीर अशा विविध सबबी आता म्हाडानं दिल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना स्वस्त दरांमध्ये घरं उपलब्ध कररुन देण्याचं काम म्हाडा करतं. मात्र सात वर्षं उलटून गेली तरी घराचा ताबा न देणारं म्हाडा या लोकांच्या भावनांशी खेळत आहे. आणि ज्या वेळी हा मुद्दा उपस्थित केला जातो. त्यावेळी म्हाडाकडून नवं आश्वासन आणि नव्या डेडलाईनशिवाय लाभार्थींच्या पदरात काहीच पडत नाही.