www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्पॉट फिक्सिंगचे आरोप असलेल्या अंकित चव्हाणला दिल्लीच्या साकेत कोर्टाच्या सेशन कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. दोन जून रोजी नियोजित विवाह असल्यामुळे अंकितने कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता. त्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय.
राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज अंकित चव्हाण याचं लग्न स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच ठरलंय. त्याला अटक झाल्याने २ जूनच्या मुहूर्तावर त्याचे लग्न होऊ शकणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मुंबईत त्याच्या आणि मुलीकडच्या परिवाराने लग्नाची सारी तयारीही केली होती. अटकेनंतर दोन्ही घरातील वातावरणात चिंताग्रस्त झालं होतं. पण आता अंकितला जामीन मिळाल्यानं त्याच्या लग्नातला अडथळा दूर झालाय. फिक्सिंग प्रकरणात पुरता फसलेल्या अंकितसाठी त्या निमित्ताने पुढचे सहा दिवस तरी घरच्यांबरोबर घालवायला मिळतील.
एक लाखाच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय. विवावाहानंतर त्याला ६ जूनला पुन्हा सरेंडर करावे लागणार आहे. आपण एका चांगल्या आणि प्रतिष्ठित कुटुंबातील असून आपल्या विवाहाच्या पत्रिकादेखील वाटण्यात आलेल्या आहेत. यामुळे आपल्याला जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज अंकितने केला होता तो मंजूर करण्यात आला आहे.
यापूर्वी सत्र न्यायालयात अंकितने जामीनासाठी अर्ज केला होता पण तिथं त्याला जामीन नाकारण्यात आला. त्यामुळे अंकित वरच्या न्यायालायात गेला होता. आज त्याच्या अर्जावर सुनावणी झाली असता एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर व तेवढ्याच रक्कमेच्या शुअरिटीवर त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.