www.24taas.com, मुंबई
मुंबईकरांनी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी केली. बाप्पासाठी सजावट, रोषणाई , फुले आणि नैवेद्याच्या तयारीसाठी मुंबईकरांची दुकानांमध्ये झुंबड उडालेली दिसून आली. मुंबईत रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. वाजत गाजत बाप्पाचे आज आगमन झाले.
घरच्या गणपतीची आरास करण्यासाठी रेखीव मखरे, फुलांच्या कमानी , रोषणाईसाठी दिव्यांच्या माळा, प्लास्टिक फुलांचे हार यासारख्या सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी कुणी सुटी घेऊन तर कुणी ऑफिस संपल्यानंतर क्रॉफर्ड मार्केट, दादर गाठले होते. बाप्पासाठी वेगळे काय करता येईल, यासाठी बाजारपेठेचा फेरफटका मारून गणेशभक्त शोध घेत होते.
फुले, पाने, पूजेचे साहित्य, अगरबत्ती, धूप यांच्या खरेदीसाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीने दुकाने ओसंडून वाहत होती . मुंबईतल्या सगळ्या बाजारपेठा बाप्पामय झाल्या होत्या. दादरच्या फुल मार्केटमध्ये दीड हजार रूपयांपासून ते अगदी १५ हजार रूपयांपर्यंतच्या आकर्षक कमानींची खरेदी करण्याकडे यंदा मोठा कल दिसून आला.
आरास करण्यासाठी सप्तरंगाची उधळण, एलईडीचा प्रकाशझोत, तसेच चकीत करणाऱ्या रोषणाईचे आकर्षण मुंबईकरांमध्ये असल्याचे दिसून आले. क्रॉफर्ड मार्केटजवळील लोहार बाजारातील दिवे, माळांना मोठी मागणी होती. गेल्या पंधरा दिवसांपासून या बाजारात गर्दी उसळली होती. इथली दुकाने गर्दीने भरून वाहत आहेत.
मंडळांतील गणपतीच्या सजावटीवर अखेरचे लक्ष टाकताना दिसत होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते . रात्रीतून सारे काम आटोपून मंडप सज्ज करण्याची कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. तर घरामध्ये ऐनवेळी बाप्पांच्या प्रतिष्ठापनेचा निर्णय घेणारी कुटुंबे सुबक मूर्ती मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी प्रदक्षिणा घालत होती.