पुण्यात मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना

पारंपरिक वातावरणात लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. वाजत-गाजत मिरवणुकीने येऊन मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ढोल-ताशांचा निनाद, बॅंडचे मधुर स्वर आणि त्याला साथ मिळणार आहे ती पथकांचा ठेका आणि रथांची.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 19, 2012, 07:27 AM IST

www.24taas.com,पुणे

पारंपरिक वातावरणात लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. वाजत-गाजत मिरवणुकीने येऊन मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ढोल-ताशांचा निनाद, बॅंडचे मधुर स्वर आणि त्याला साथ मिळणार आहे ती पथकांचा ठेका आणि रथांची.

कसबा गणपती
मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाच्या "श्रीं`ची प्रतिष्ठापना होण्यापूर्वी सकाळी नऊ वाजता मंडपापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक लाल महाल, तांबडी जोगेश्वारीमार्गे हमाल वाडा येथे येईल. सकाळी ११ वाजून १६ मिनिटांनी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे.
या निमित्ताने मंडळातर्फे "कॉटनकिंग`चे प्रदीप मराठे, खडीवाले वैद्य, "सरहद`चे संजय नहार, गिरिप्रेमी उमेश झिरपे, सनईवादक प्रमोद गायकवाड या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच जणांचा "कसबा गणपती पुरस्कार` देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या वर्षीपासून कसबा गणपतीचे माजी अध्यक्ष "ऍड. भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार` देण्यात येणार असून, हा पुरस्कार सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना प्रदान करण्यात येणार आहे.

तांबडी जोगेश्वअरी
मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्व री गणपती मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने वाजतगाजत पालखीत "श्रीं`च्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंदार लॉज येथून मिरवणूक निघेल. दुपारी बारा वाजता "पीएनजी ऍण्ड सन्स`चे संचालक अजित गाडगीळ यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे.

गुरुजी तालीम
मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपती मंडळातर्फे सकाळी नऊ वाजता फुलांच्या रथात "श्रीं`ची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंडळातर्फे यंदा फायबरची नवीन गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. याच मूर्तीची यंदा प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार विनायक देव, प्रतापसिंह परदेशी, पद्माकर गोकुळे, वसंतराव करमरकर आणि दत्तोबा मरळ या पाच जणांच्या हस्ते यंदाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

तुळशीबाग गणपती

गणपतीची भव्य मूर्ती असणाऱ्या मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपती मंडळाच्या "श्रीं`ची सकाळी पावणेनऊ वाजता प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर आणि ऍड. अनिल हिरवे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. गणपतीसाठी "बर्मा` लाकडाचा भव्य चौरंग बनविण्यात आला आहे.
केसरी वाड्याचा गणपती
मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरी गणेशोत्सवास टिळक पंचांगानुसार मंगळवारी टिळकवाड्यात सुरवात झाली.