ऋषी देसाई
गणपतीचो उत्सव.. हा हा म्हणता कधी वरष सरता कळनाचं नाय.. खर तर ह्यो उत्सव जगाचो आसलो तरी कोकणातल्या वाडीवाडीत जा काय धुमशान व्हता ना ता काय़ सांगाचा म्हाराजा.. आज ऑफीसात बसान यो ब्ल़ॉग लिवता ना देहान फक्त मुंबयत आसान काळीज आणि मन केवाच गावात जावान पोहोचलाय.. आणि ल्हानपनापासूनचे सगळे आठवनी अशे नाचकं लागले.. की जणू काय टाळार कूदणारे बारके पोरचं.. आज हकडे ऑफीसातले इचारतत.. इतक्या काय आसात रे कोकनात, कशाक सगळे धावततं गनपतीक गावाकडे.. खरा तर या प्रश्नाचा उत्तर त्या तांबडी मातीत नाळ पुरल्याशिवाय नाय कळचा.. गावातले चतुर्थी म्हनजे काय सांगाचा.. सगळाच अगदी लख्ख आठवता.
खरातर ह्यो खेळ याच येळाक सुरु व्हय.. होय गनपतीच्या आदले दिवशी.. माज्या शहरातल्या घराकडे गनपती नाय.. मुळ घर गावाकडे.. आनी आमच्या कोकनात येक प्रथा हा.. खरातर ही प्रथा लय गंमतशीर हा.. समजा कोनी नयीन घर बांधल्यान तर तेच्या घरासमोर राती आवाटातले पोर गनपती आणून ठेवततं.. घरमालकाकडंन पैशे न घेता आवाटातले असा कसा करततं ह्यो प्रश्न.. पन कोकनातले गनपतीसाठी आणि गणपतीच्या काळात कायवं करतील.. आणि नूसतो गनपतीच नाय तर गनपतीचा सामान पन ठेवतत.. म्हनान आपल्या घरासमोर कोनी गनपती ठेव नये म्हनान रातभर जागरन करायचा.. आनी मग सगळ्यानी आळीपाळीनं रात जागावायची.. तेच्यातच मग पहाट होय.. मग वेध लागायचे गावाकडे जावचे..
माझा मूळ घर तसा शहरापासून लांब गावाकडेच.. गावात पंश्याएशीच्या सुमारास एसटी नाय जायचे.. तेवा माका आठवता बरोबर चार मैल चालत जाव.. आनी घराकडे पाऊल ठेवल्यावर वसरेर दिसायचो तो नयीन टायेल घातलेलो गनपती.. माटी सजलेली असायची.. गावाकडे थर्माकोलची मखरा ह्यो प्रकार नसायचो.. मस्त रानाफुला आणि फुला लावलेली माटी.. तो घमघमाट आजूनय नाकात परमाळाता.. त्यानंतर गनपतीची प्रानप्रतिष्ठा आणि मग दुपारी आरत होये.. जेवनाक तांदळाची खीर, पाच भाजये, पुरनपोळये, काळ्या वाटान्याचा सांबर, आणि वडे.. जो काय आडयो हात मारु ना बरोबर दुपारपर्यंत तंगडे तानून झोपान टाकू.. मग राती सव्वासातची गाडी आसायची..
गाडीत बसतानायं तेच्यातय येक गंमत आसायची.. एसटी काचेतनं चंद्र दिसलो तर.. मनात जाम भिती.. आणि मग दिड तासाचो प्रवास मान खाली घालून करायचो.. आज दहा मिनीटाच्या प्रवासात मोबाईलचो हेडफोन लावची येळ येता ना तेवा कसातरीच वाटता...
आजये ते आठवनी मनात घर करुन बसले हत.. गेली चार वर्सा गावाकडे जावचो योग ना येना.. टीईरं दूनियेचे गनपतीचे बातमे सांगतव.. अनंत चतुर्थदशीकं मुंबय- पुन्याच्या गनपती पोहोवताना मोठेमोठे बाता करताना कसला भान रवना नाय़.. ब्रेकमध्ये आठवता तो विहीरीच्या तळाशी जानारो तो गनपती.. आणि त्या गणपतीचा दर्शन न घेनारो मी कमनशिबी...
खरतर माफी मागूकयं शब्द नायत.. खरतर तुझेच आशिर्वाद घेवनं आमी कामाक सुरुवाक करतवं.. कामात यश मिळाल्यारं मात्र तुज्या पाय़ारचं येवक नाय गावाना.. खरातर मनातली ही सल दूस-याक सांगान नाय कळाची म्हनानच ह्यो पत्रप्रंपच.... जमला तर माफ कर रे म्हाराजा...