www.24taas.com,सुवर्णा जोशी, ठाणे
नेहमीच धोतर आणि पोथीची पिशवी घेऊन बाईकवर फिरणा-या गुरुंजीऐवजी आता लख्ख नऊवारी सोवळ्यात लगबगीत असलेल्या महिला पुरोहित दिसल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. यंदा गणेश चतुर्थीला हे पुणे-डोंबिवलीत सर्रासपणे दिसण्याची शक्यता आहे.
ही तयारी सुरु आहे गणरायाच्या आगमनाची. अथर्वशिर्षासह, गणेश याग, रुद्र आणि गणेशाची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, हे इथं शिकवलं जातयं आणि तेही महिलांना. गेल्या १५ वर्षांपासून वेदमूर्ती सुनील जोशी डोंबिवलीत त्यांच्या राहत्या घरी महिलांना पौराहित्याचे धडे देतायेत. त्यांच्याकडून पौरोहित्य शिकलेल्या महिलांनी आत्तापर्यंत अनेक लग्न लावून दिलीत. एवढचं नाही तर सत्यनारायण, सप्तशती, नवचंडी आणि वास्तूशांत करण्यातही या महिला पुरोहित अग्रेसर आहेत.
सुरुवातीला महिलांनी पौरोहित्य करावे की नाही, यावरुन काही काळ वादंगही निर्माण झाला होता. मात्र आता बदलत्या काळात या क्षेत्रात निपुण असल्याचं दाखवत, पुरुषांची मक्तेदारी या महिलांनी मोडीत काढलीय.
आता श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी भटजींची वानवा असताना, महिला पुरोहितांची मागणी वाढतेय आणि या महिलाही ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतायेत. समाजाची मानसिकता बदलत असल्याचं हे उत्तम लक्षण आहे.