www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत काही नीच आणि नराधम प्रवृत्तीच्या तरूणांनी एका महिलेचा कसा विनयभंग केला, याची छायाचित्रंच ‘मिड डे’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केलीत. लालबागमध्ये घडलेल्या सामूहिक विनयभंगाच्या या प्रकारामुळं एकच खळबळ उडालीय.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचे डोळे भरून दर्शन घेण्यासाठी हजारो आबालवृद्ध भाविक रस्त्यांवर उतरतात. विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा तोबा गर्दी उसळलेली असते. त्यामध्ये महिला आणि तरूणींची संख्याही लक्षणीय असते आणि याच श्रद्धाळू गर्दीचा फायदा काही बेशरम आणि विकृत मनोवृत्तीचे लोक उचलतात... गर्दीमध्ये घुसून हे नराधम महिलांच्या अंगाला हात लावून अश्लील चाळे करतात. यंदा लालबागच्या गर्दीतील असाच एक घृणास्पद प्रकार ‘मिड डे’ या इंग्रजी वृत्तपत्राचे छायाचित्रकार अतुल कांबळे यांनी उघडकीस आणलाय. रस्त्यावरील भर गर्दीतील सामूहिक विनयभंगाची ही घटना त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. त्यामुळं एकच खळबळ उडालीय.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सामूहिक विनयभंगाच्या या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय. अशा नराधमांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आलीय.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने पावलापावलावर पोलीस बंदोबस्त तैनात असतो. मात्र, तरीही गर्दीचा फायदा घेत, नीच वृत्तीचे लोक असे प्रकार करतात. त्यामुळे पोलिसांवर अवलंबून न राहता, महिला आणि तरूणींनीच स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला स्थानिक नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी दिलाय.
गर्दीत घुसून महिलांशी अश्लील चाळे करणारे हे लोक विकृत असतात. गर्दीच्या ठिकाणी जाणीवपूर्वक ते आपले सावज शोधत असतात, असं मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटलंय.
मुंबईमधील बलात्काराच्या आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतायत. त्यामध्ये आता सामूहिक विनयभंगाचे असे घृणास्पद प्रकार उजेडात येत आहेत. अशा घटनांची दुर्दैवाने पोलीस रेकॉर्डमध्ये नोंदही होत नाही. महिलांनीच आता पुढे येऊन अशा प्रकारांची नोंद पोलिसांकडे करायला हवी. पण केवळ तक्रार नाही म्हणून पोलीस फोटोत दिसणाऱ्या अशा नराधमांवर कारवाई न करता, थंड बसून राहणार का?
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ