www.24taas.com, झी मीडिया, मुंबई,
बॉलिवूडचे अनेक चमचमते तारे आता लोकसभेच्या प्रांगणात अवतरलेत... एकीकडे वजनदार राजकारण्यांना मतदारांनी धूळ चारली असताना, बॉलिवूडच्या सिता-यांना मात्र सर आँखो पर उचलून घेतलंय... त्यामुळं लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल, तेव्हा हे कायदेमंडळ आहे की बॉलिवूडचा सेट, असा प्रश्न पडला तर आश्चर्य वाटायला नको...
अब की बार... मोदी सरकार तर आहेच... पण अब की बार, फिल्मी सरकार देखील असणार आहे... कारण बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर झळकणारे अनेक सितारे आता लोकसभेच्या पवित्र मंदिरात दिसणार आहेत... त्यामुळे गंभीर चर्चा करणारं लोकसभेचं कायदेमंडळ फुल्टू फिल्मी असणार आहे...
शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी पटना साहिबमधून आपल्या विरोधकांना खामोश केलंय... भाजपच्या तिकिटावर तब्बल 2 लाख 65 हजार 805 मतांनी ते विजयी झाले.. आपल्या विजयासाठी मेहनत घेणा-या भाजप कार्यकर्त्यांचे आणि पटना साहिबच्या मतदारांचे त्यांनी खास आभार मानलेत...
लोकसभेत दुसरा ओळखीचा चेहरा असणार आहे तो ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांचा... मथुरामधून ब्रजवासी मतदारांनी भाजपच्या हेमामालिनी यांना साडे तीन लाख मतांनी विजयी केलंय...
दबंग सलमान खानच्या वडिलांचा रोल करणारे सिने अभिनेते विनोद खन्ना भाजपच्या तिकिटावर गुरूदासपूरमधून विजीय झालेत. त्यांनी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष प्रताप सिंग बाजवा यांना पराभवाचं पाणी पाजलं...
`बाबुभय्या` परेश रावलही आता स्टार गॅरेजमधून थेट लोकसभेत पोहोचलेत... गुजरातच्या अहमदाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते सव्वा तीन लाख मतांनी विजयी झाले.
चंदिगडसाठी `परदेसी` असलेल्या बुजूर्ग सिने अभिनेत्री किरण खेर यांनी आपच्या सिनेस्टार उमेदवार गुल पनाग यांना पलटी दिली. किरण खेर यांच्या प्रचारयात्रेदरम्यान काहींनी त्यांच्यावर अंडी फेकली, काळी निशाणं फडकवली. पण सिनेमाप्रमाणे इथंही हॅप्पी एन्डिंग झालं... `अच्छे दिन आ गये...` अशी प्रतिक्रिया त्यांचे पती अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केलीय.
भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी यांनी उत्तर पूर्व दिल्लीमधून तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवला. करिअरच्या संघर्षाच्या काळात आपण यमुना बाजार भागात राहत होतो, असं सांगून त्यांनी दिल्लीकरांशी नाळ जोडली. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला.
ख्यातनाम बॉलिवूड सिंगर बाबुल सुप्रियो यांनी देखील आसनसोल मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभेत एन्ट्री घेतलीय... लोकांची गाण्याची फर्माईश पूर्ण करणारे बाबुल आता लोकसभेत जनतेच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे...
भाजपच्या या स्टार, यार, कलाकारांच्या मांदियाळीत भर पडलीय ती जुन्या जमान्यातील गाजलेल्या सिने अभिनेत्री मूनमून सेन यांची... तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर बंकुरामधून त्यांनी सीपीएमचे नऊवेळ खासदार असलेले आचार्य बासूदेव यांना धूळ चारली आणि त्या जायंट किलर ठरल्या...
दरम्यान, गुल पनाग, राखी सावंत, रवी किशन, स्मृती ईराणी, बप्पी लाहिरी, नगमा, महेश मांजरेकर, प्रकाश झा आणि राज बब्बर या बॉलिवूडकर मंडळींचा करिष्मा मात्र लोकसभेत चालला नाही. अन्यथा लोकसभेत नेते कमी आणि अभिनेते जास्त, असं चित्र दिसलं असतं...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.