अजित पवारांना दगाबाजीची भीती...दादा लागलेत कामाला

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षअंतर्गत विरोध होवू नये यासाठी प्रयत्न करतायेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही लोकसभा निवडणुकीत या गटबाजीचा फटका बसू नये म्हणून पिंपरी चिंचवड या बालेकिल्यातून सुरुवात केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 5, 2014, 08:50 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षअंतर्गत विरोध होवू नये यासाठी प्रयत्न करतायेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही लोकसभा निवडणुकीत या गटबाजीचा फटका बसू नये म्हणून पिंपरी चिंचवड या बालेकिल्यातून सुरुवात केलीय.
भोसरी विधानसभा मतदार संघातले पक्षाचे महत्त्वाचे नेते महेश लांडगे यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद बहाल करत दादांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात होणा-या संभाव्य गटबाजीला लगाम लावलाय.
पुणे जिल्ह्यात येणा-या शिरूर लोकसभा मतदारसंघात शिव सेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देवदत्त निकम यांच्यात सामना रंगणार हे स्पष्ट झालंय. पण सेनेच्या आढळराव पाटील यांच्या तुलनेत देवदत्त निकम अगदीच नवखा उमेदवार आहे. त्यामुळ पक्षाच्या या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतदारसंघातली गटबाजी मोडण्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं पावलं टाकायला सुरुवात केलीय.
त्याचाच एक भाग म्हणून दादांनी शिरूर मतदारसंघात येणा-या भोसरी विधानसभा मतदार संघात गटबाजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय. या मतदारसंघात आमदार विलास लांडे आणि महेश लांडगे यांचा परस्पर संघर्ष संपूर्ण शहराला माहीत आहे. त्यामुळे दादांनी महेश लांडगे यांना थेट सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून ओळखल्या जाणा-या स्थायी समितीचं अध्यक्षपद देत हा संघर्ष दूर करण्याचा प्रयत्न केलाय.
असं असलं तरी महेश लांडगे यांनी विधानसभा निवडणुकीत आपण दावेदार असल्याच सांगितलंय. केवळ स्थायी समिती अध्यक्षपद मिळालं म्हणून महत्वाकांक्षेला लगाम घालणार नाही हे लांडगेंनी स्पष्ट केलंय.
शिरूर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सहा पैकी हडपसर वगळता इतर पाचही मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातली गटबाजी दूर करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची व्युहरचना आहे. या भागातली गटबाजी दूर झाली तर शिरूरमध्ये देवदत्त निकम आढळराव यांचा पराभव करून चमत्कार करतील अशी आशा पक्षाला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.