www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
लाल शामशाह लाल भगवानशाह हे माजी खासदार 1962 मध्ये एका वर्षाच्या काळात संसदेची पायरीही चढले नाहीत. मोठ्या नामुष्कीने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र याच मतदारसंघातील सध्याच्या खासदारांना सर्वाधिक उपस्थितीसाठी पुरस्कार दिला गेलाय. खासदाराची संसदेतील हजेरी वाढली असली तरी विकासाचे वारे या मतदारसंघात वाहिलेत का हा खरा प्रश्न आहे.
चंद्रपूर.... City of Black Gold म्हणजे कोळसाखाणींचं शहर. देशाच्या वाढत्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी कोळसा पुरवणा-या सुमारे ५० खाणी चंद्रपूरमध्ये आहेत. चंद्रपूर म्हणजे प्राचीन गोंड साम्राज्य काळातील राजधानीचं शहर. हे शहर सध्या आपल्या स्थापनेची पंचशताब्दी साजरी करत आहे. दक्षिण भारताला उत्तरेशी जोडणारा एक सांस्कृतिक दुवा. २२ किमी लांब देशातील एकमेव भुईकोट किल्ला व राणी हिराईने राजे विरशाहच्या- आपल्या पतीच्या स्मरणार्थ बांधलेले भव्य समाधीस्थळ हे चंद्रपूरचं भावनिक मर्मस्थान. झाडीपट्टी रंगभूमीचा झगमगाट अन डाळीपासून तयार होणारी खास चंद्रपुरी वड्याची लज्जत म्हणजे क्या बात... क्या बात...
राज्याचा वनाच्छादित, आदिवासी, वन्यप्राणी बहुल असा हा भूभाग. मात्र लाल मातीचे चंद्रपूर व ताडोबाच्या रस्त्या-रस्त्यावर फिरणारे वाघ ही निसर्गदत्त ओळख मागे पडून आपल्या कोळसा या खनिज भांडाराच्या जीवावर चंद्रपूरने अमाप संपत्ती पाहिली. परंतु धंदा कोळशाचा असल्याने स्थानिक मराठी माणूस मागे पडला. या कामात परप्रांतीयांचा चंचुप्रवेश झाला. चंद्रपूर विकासापासून कोस मैल दूर....धुळीने भरलेले रस्ते अन श्वसनाचे- कातडीचे रोग इथल्या वातावरणात पाचवीलाच पुजलेत... चंद्रपूर-बल्लारपूर-वणी ही शहरे सोडली तर बाकीचा लोकसभा मतदारसंघ ग्रामीण तोंडवळ्याचा आहे.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात 2009 मध्ये 15 लाख 36 हजार 352 मतदार होते. यापैकी 7 लाख 96 हजार 156 पुरुष तर 7लाख 40 हजार 196 महिला मतदार आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. मारोतराव कन्नमवार यांचे गृहक्षेत्र असलेल्या चंद्रपूर मतदारसंघाने काँग्रेसला भरभरून दिले. काँग्रेसच्या तिकिटावर कुणालाही उभे केले तरी तो निवडून येणार ही काँग्रेसजनांची खात्री. भाजपने काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा फायदा घेत इथं पक्के पाय रोवले. आणि आता चंद्रपूर लोकसभा भाजपचा बालेकिल्ला बनलाय...
1977साली या मतदारसंघातील जनतेने काँग्रेसला पहिला धक्का दिला. त्याआधी काँग्रेस एके काँग्रेस चालणा-या जनतेने आणीबाणीविरोधी कौल देत आदिवासींचे राजे विश्वेश्वरराव महाराज यांना संसदेत पाठविले. हा अपवाद वगळता नंतरच्या काळात 1980, 19884,1989,1991अशा चार टर्म राज्यातील काँग्रेसचे हेवीवेट नेते शांताराम पोटदुखे यांनी सुखेनैव खासदारकी उपभोगली. 1996साली भाजपने राममंदिर मुद्यावर आघाडी घेत हंसराज अहिर यांच्या रुपाने विजयाचे पहिले पाऊल टाकले. मात्र लगेच 2 वर्षांनी पारडे फिरले. काँग्रेसचे कामगार नेते नरेश पुगलिया यांनी भाजपला हरवून पुन्हा काँग्रेसला विजय मिळवून दिला. 1999सालीही हाच विजय कायम राहिला. 2004साली भाजप उमेदवार हंसराज अहिर यांनी पुन्हा बाजी मारली. 2009 मध्येही तेच पुन्हा विजयी झाले. 2009साली गडचिरोलीचा मोठा आदिवासी मतदार चंद्रपूर लोकसभेतून वेगळा झाला. यवतमाळ जिल्ह्यातील २ विधानसभा मतदारसंघ चंद्रपूरला जोडले गेले, त्यानंतरही भाजपने मिळविलेले यश उल्लेखनीय ठरले. सध्या भाजपचे हंसराज अहिर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत
विधानसभा मतदारसंघातील संख्याबळावर नजर टाकल्यास हे क्षेत्र काँग्रेसचं पारडं जड
चंद्रपूर जिल्ह्यातच भाजपचे २ आमदार आहेत. पैकी बल्लारपूर मधून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार व चंद्रपूरमधून गडकरींचे विश्वासू नाना शामकुळे यांचा समावेश आहे. याच जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रातून जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेसचे संजय देवतळे तर राजुरा क्षेत्रातून सुभाष धोटे हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय काँग्रेस आमदार आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभेतून शिवसेनेला धक्का देत वामनराव कासावार हे काँग्रेस आमदार व आर्णी मधून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे काँग्रेसचे आमदार आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून जनतेने काँग्रेसला झुगारून भाजपला पसंती दिल्याला आता एक दशक उलटलंय. मात्र इथल्या मुलभूत समस्यांची सोडवणूक करण्याची सुरुवात देखील झालेली नाही. काँग्रेसच्या `हा नको, तो नको`च्या वादात भाजपला जनतेने पसंती दिली. मात्र मिळालेल्या संधीचा विकासाच्या दृष्टीन