ऑडिट मतदारसंघाचं : नागपूर

ऑडिट मतदारसंघाचं - नागपूर

Updated: Apr 4, 2014, 01:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपूर मतदारसंघात सर्वात आधी एक महिला खासदार निवडून आली होती. ज्यावेळी महिला आरक्षणाची चर्चाही नव्हती, त्या काळी 1951 मध्ये इथल्या जनतेनं एका महिलेला खासदार म्हणून लोकसभेवर पाठवलं होतं...
  महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भाची अघोषित राजधानी नागपूरमध्ये.... संत्रानगरी अशीही या शहराची ओळख आहे. एकेकाळी सेंट्रल प्रोविंसचा भाग असलेले नागपूर शहर हे सध्याच्या मध्य प्रदेश राज्याची राजधानी होती. फक्त विदर्भच नाही, तर मध्य भारतातील मोठे आणि महत्वाचे शहर म्हणून नागपूरकडे पाहिलं जातं. 
एकेकाळी हिंदी भाषिक राज्याची राजधानी असल्याने असल्याने नागपुरात हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात राहतात.स्थानिक रहिवाश्यांवर आणि संस्कृतीवर हिंदीचा पगडा आहे.
2009मध्ये  17 लाख 38 हजार 920 मतदार होते....पुरुष मतदार 9 लाख 3हजार 688 तर महिला मतदार 8 लाख 35 हजार 232 होते....
नागपूरला  ६६ टक्के मतदार हिंदू आहेत. त्या पाठोपाठ २० टक्के बुद्ध धर्मीय, ११ टक्के मुस्लिम, ख्रिश्चन आणि जैन धर्मीय मिळून २.५ टक्के आणि इतर ०.५ टक्के मतदार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय इथं आहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमीही इथं आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असल्यानं इथं वर्षातून एकदा हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकारणाचा फड रंगतो. पण एवढं होऊनही विदर्भाचा विकासाचा अनुशेष बाकी असल्यानं नागपूरकर मंडळी नाराज आहेत. विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण व्हावं, अशी मागणी कित्येक वर्षांपासून आहे. तेलंगणाच्या निर्मितीमुळे ही जखम पुन्हा चिघळली गेलीय.
नागपूरची अर्थव्यवस्था चाकरमाने आणि व्यापारावर आधारीत आहे. इथं मोठे उद्योग अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत. पण राष्ट्रीय पातळीवर झालेल्या अनेक सर्वेक्षणात नागपूरची गणना वेगाने वाढणा-या शहरांमध्ये झाली आहे. मिहानसारखे प्रकल्प येऊ घातल्याने जमिनींना सोन्याचा भाव आलाय...
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कर्मभूमी असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात वर्चस्व मात्र काँग्रेसचंच राहिलंय.. दलित आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने नागपूर हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो.
अनुसयाबाई काळे, माधव श्रीहरी अणे, एन. आर. देवघरे, जांबुवंतराव धोटे, गेव अवारी, दत्ता मेघे असे अनेक दिग्गज इथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. 1996 साली बनवारीलाल पुरोहित यांच्या रूपाने अपवादाने भाजपचा खासदार निवडून आला. पण पुरोहित हे देखील कधीकाळी काँग्रेसमध्ये होते. विदर्भवादी काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार सध्या नागपूरचे खासदार असून, ते लागोपाठ चारवेळा इथून विजयी झालेत. 
 
नागपूर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पूर्वी या मतदारसंघाचा भाग असलेला कामठीचा भाग आता रामटेक मतदारसंघात गेलाय. त्यामुळे आता नागपूरमधील सर्व विधानसभा मतदारसंघ शहरी तोंडवळ्याचे आहेत. 
नागपूर उत्तर (राखीव) मधून रोहयोमंत्री नितीन राऊत आणि नागपूर दक्षिणमधून दिनानाथ पडोळे हे दोघेच काँग्रेसचे आमदार आहेत. नागपूर दक्षिण पश्चिममधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, नागपूर पश्चिममधून सुधाकरराव देशमुख, नागपूर मध्यमधून विकास कुंभारे आणि नागपूर पूर्वमधून कृष्णा खोपडे हे आमदार निवडून आलेत.
देशातील सर्वात हिरवंगार शहर असलेल्या नागपुरातील राजकीय वातावरण तापू लागलंय.. लोकसभा निवडणुकीत कायम काँग्रेसला साथ देण्याची नागपूरकरांची परंपरा यंदा खंडीत होणार का, हा सध्या इथला चर्चेचा विषय आहे.
         
निवडणुकीचा इतिहास
नागपूरच्या इतिहासात जांबुवंतराव धोटे आणि बनवारीलाल पुरोहित असे दोन माजी खासदार आहेत, जे दोनवेळा वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावर इथून निवडून आलेत. 1971 मध्ये फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर विजयी झालेल्या धोटेंनी 1980 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. तर 1984 आणि 1989 मध्ये काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर जिंकणारे पुरोहित 1996 मध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर नागपूरमधून विजयी झाले होते.
विलास मुत्तेमवार यांची ओळख
देशाच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात, ७ वेळा लोकसभेवर निवडून जाणं काही सोपं नाही...  पण नागपूरचे विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार यांनी ही किमया साधलीय. तीनवेळा चिमूरमधून आणि लागोपाठ चारवेळा नागपुरातून ते लोकसभेवर विजयी झालेत... त्यांच्या राजकीय वाटचालीवर एक नजर टाकूया...
नाव - विलास मुत्तेमवार
जन्म - 22 मार्च 1949
वय - 64
शिक्षण - बी. कॉम.