www.24taas.com, झी मीडिया, सुलतानपूर
लाईव्ह टीव्ही शो दरम्यान एका तरुणानं स्वत:ला पेटवून घेऊन बसपा नेत्याला मिठी मारली... ही धक्कादायक घटना घडलीय उत्तरप्रदेशातील सुलतानपूरमध्ये... गंभीर स्थितीत तरुणाला लखनऊला आणल्यानंतर मंगळवारी त्याचा मृत्यू झाला तर बसपा नेत्याची परिस्थिती अजूनही गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.
सोमवारी सायंकाळी दूरदर्शनचा एका जनमत कार्यक्रम लाईव्ह सुरू होता. यामध्ये भाजप, काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा आणि आपचे काही नेते सहभागी झाले होते. त्यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू होती. याचवेळी अचानक एका तरुणानं स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतलं... इतकंच नाही तर त्यानं पेटलेल्या अवस्थेतच या चर्चेत सहभागी झालेल्या एका बसपा नेत्याला मिठी मारली... कमरुज्जमा फौजी असं या बसपा नेत्याचं नाव आहे.
लोकांना काही कळायच्या आतच या दोघांना ज्वाळांनी चांगलंच घेरलं. परंतु, लवकरच उपस्थितांनी या दोघांच्या अंगावरची आग विझवण्याचा प्रयत्न केला. एव्हाना हे दोघे गंभीररीत्या भाजले होते.
जळालेल्या दोघांनाही जिल्हा हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलं. तिथून त्यांना लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुण ९५ टक्के तर बसपा नेता ७०-७५ टक्के भाजलेत.
संबंधित तरुणाचं नाव दुर्गेश सिंह असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. तसंच दुर्गेशचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं... त्याचे आपल्या कुटुंबीयांशीही संबंध चांगले नव्हते. परंतु, दुर्गेशनं हे पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.