बिहारचे नवे मुख्यमंत्री ठरणार? लालूंना घातली साद

बिहारमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सत्ताधारी जेडीयू पक्षाचा पार धुव्वा उडाल्यानं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जेडीयूनं आज आमदारांची बैठक बोलावलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 18, 2014, 10:16 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पाटणा/बिहार
बिहारमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सत्ताधारी जेडीयू पक्षाचा पार धुव्वा उडाल्यानं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जेडीयूनं आज आमदारांची बैठक बोलावलीय.
जेडीयू आज नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करणारेय. तर जेडीयू अध्यक्ष शरद यादव यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावं असं सांगत राष्ट्रीय जनता दलालाही साद घातलीय. तर दुसरीकडे भाजपही चांगलाच आक्रमक झालं असून बिहारचे भाजपचे प्रभारी धमेंद्र प्रधान मोदींच्या भेटीला गेलेत.
लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सत्ताधारी जेडीयू पक्षाचा पार धुव्वा उडाल्यानं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागांपैकी जनता दल युनायटेडला केवळ 2 जागा मिळाल्या. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून, नितीशकुमारांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला.
आसामचे तरूण गोगोई यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाची राजीनामा देणारे ते दुसरे मुख्यमंत्री आहेत. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये जेडीयूला 20 जागा मिळाल्या होत्या. मात्र धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून नरेंद्र मोदींशी तीव्र मतभेद झाल्यानंतर, जून 2013 मध्ये नीतीशकुमार एनडीएमधून बाहेर पडले. भाजपशी काडीमोड घेतल्यानं, त्यांचं सरकार याआधीच अल्पमतात आलंय.
आता लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे पक्षाध्यक्ष शरद यादव यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवारांना दारूण पराभव पत्करावा लागला. केवळ पूर्णिया आणि नालंदा अशा दोनच मतदारसंघात जेडीयूचे खासदार अल्प मताधिक्याने निवडून आले. या पराभवानंतर नीतीशकुमारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.