राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत; फिल्डींग सुरू!

लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळामध्येही फेरबदल होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत... मंत्रिमंडळातील या फेरबदलांमध्ये कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची वर्णी लागणार, याबाबतची जोरदार चर्चा सध्या रंगलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 9, 2014, 10:58 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळामध्येही फेरबदल होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत... मंत्रिमंडळातील या फेरबदलांमध्ये कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची वर्णी लागणार, याबाबतची जोरदार चर्चा सध्या रंगलीय.
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, समाजकल्याणमंत्री शिवाजीराव मोघे, सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे आणि मदत पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस यंदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. ते खासदारपदी निवडून आल्यास त्यांच्या जागी कोण मंत्री होणार, यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरूवात झाल्याचे समजतं. येत्या 16 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांचं काम न करणाऱ्या पालकमंत्र्यांवर कारवाई करण्याचे संकेतही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘झी मीडिया’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिले होते. त्यामुळे काही पालकमंत्र्यांची लाल बत्ती गूल होणार असल्याची चर्चा आहे. त्याजागी आपली वर्णी लागावी, यासाठी आतापासूनच इच्छुकांनी हालचाली सुरू केल्यात.
दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेऊन लाँबिंगला सुरूवात झालीय. सहा महिन्यातच विधानसभेची निवडणूक होणार असल्यानं जातीय समीकरणं लक्षात घेऊन रिक्त मंत्रीपदाच्या जागा तातडीने भरण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय.
शिवाजीराव मोघे विजयी झाले तर त्यांच्या जागी वर्णी लागावी, यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून वसंत पुरके आणि स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची फिल्डिंग लागल्याचं समजतंय. तटकरे निवडून आल्यास त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांची वर्णी लागणार असल्याचं समजतं. सुरेश धस जिंकल्यास राज्यमंत्री पदासाठी बीडमधून धनजंय मुंडे प्रयत्नशील आहेत. त्याशिवाय प्रकाश सोळंकीदेखील इच्छूक असल्याचं समजतंय.
शरद पवार यांनी निवडणूक निकालाआधीच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची व मंत्र्यांची बैठक बोलावलीय. त्यावेळी संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... त्यामुळे आता सर्वांचं लक्ष 16 मे या एकाच तारखेकडं लागलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.