www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्रात भाजपमध्ये नेमके अधिकार कुणाला, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. शिवसेना-भाजप युतीमध्ये सगळं गुण्यागोविंदानं सुरू असताना बिब्बा टाकला जातो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गडकरींचं नाव न घेता टीका केलीय.
तसंच राजकारणातून जे संपले आहेत, त्यांना आता मोदींचा मुखवटा घालून वावरावं लागतंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसेलाही टोले लगावलेत. मुंबईत आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून मनसे आणि गडकरींना नाव न घेता टोला लगावलाय.
उद्धव ठाकरे यांनी भाजपला दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. भाजपमध्ये नेमका निर्णय कोण घेतं? आणि ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची त्यांच्याच साथीनं सरकार स्थापन करणार असाल तर `आप` आणि भाजपमध्ये अंतर काय, असा म्हणत त्यांचा पाठिंबा घेणार असाल तर स्पष्ट करा? असा सवालही उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारलाय.
नितीन गडकरी आणि तावडे आणि आशिष शेलार यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना-भाजपमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. मात्र राजीव प्रताप रूडी यांनी आपल्याशी फोनवरून बातचित केल्याचं आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन आपली युती अभेद्य असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.