www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
नरेंद्र मोदी आणि 2002ची गुजरात दंगल हा विषय काही केल्या संपत नाही. मोदींनी माफी मागावी हा विषय पुन्हा एकदा पुढं आलाय. त्यावर माझ्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या काँग्रेसनं आधी आपल्या पापांचा हिशेब द्यावा, असा हल्ला चढवत मोदींनी माफीसंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिलंय.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांनी गुजरात दंगलीचा मुद्दा लावून धरला आहे. इतका नरसंहार होऊनही गुजरातचे मुख्यमंत्री या नात्यानं जनतेची माफी मागायचं सौजन्यही मोदींनी दाखवलेलं नाही, असं टीकास्त्र सोडून काँग्रेस आणि मित्रपक्ष त्यांना `व्हिलन` ठरवत आहेत. या गंभीर विषयाबाबत एका वृत्तवाहिनीवर मुलाखतीत मोदींना विचारलं असता, माफी मागण्याऐवजी त्यांनी काँग्रेसलाच चपराक लगावली आणि आपल्या पापांचा पहिले हिशोब द्यावा, हे ठणकावलंय.
नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं देशासाठी धोकादायक असल्याचा प्रचार काँग्रेस करतंय यालाही मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलंय. गेली १२ ते १५ वर्षं आपण गुजरातचे मुख्यमंत्री आहोत. जर माझ्यापासून धोका असता, तर तो गुजरातवासियांनाही जाणवला असता. परंतु, तसं काहीच चित्र नाही, असं त्यांनी नमूद केलं. देशात मोदींची नव्हे, तर भाजपचीच लाट आहे, असं मोदींनी अगदी आवर्जून सांगितलं. भाजप ही आपली आई आहे आणि कुठलाही मुलगा कधीच आईपेक्षा मोठा होत नाही, असं ते म्हणाले. रालोआ लोकसभेच्या ३०० जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.