www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या `सामना`तून मुलाखत दिलीय. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रकाशित करण्यात आलाय. यात त्यांनी लोकसभा निवडणुकांचं महत्त्व स्पष्ट केलंय.
‘‘ही लढाई केवळ स्वार्थासाठी नाही, तर देशासाठी आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकू,’’ असा निर्धार त्यांनी केलाय! शिवसेनेतून जे निवडणुकीच्या तोंडावर गेले ते एकटेच गेले. ते नुसतेच नाममात्र होते. शिर्डीतील लोकसभा उमेदवार बबनराव घोलप यांच्या न्यायालयीन निर्णयावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले! निवडणुकीच्या तोंडावरच हा निकाल कसा लागला? मग पद्मसिंह पाटील, तटकरे, अशोक चव्हाण हे अद्यापि मोकळे कसे, असा सवाल त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांना एका बाजूला आता काही लोक सोडून गेले, पण जे आधीच सोडून गेले त्या नारायण राण्यांसारख्या नेत्यांचे आता शिवसेना आणि बाळासाहेबांच्या आठवणीने डोळे पाणावत आहेत, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी "शिवसेनेत शिवसैनिकांचं जे प्रेम आहे ते प्रेम दुसर्या कोणत्याही पक्षात मिळणं शक्य नाही, असं म्हणत ज्यांना हे उमाळे फुटले आहेत त्यांना जर का प्रेम खरंच आलं असेल तर त्यांनी मोकळेपणानं बोलावं. मग त्यांनी त्यावेळेला जी शिवसेनाविरोधी पावलं टाकली होती ती का टाकली होती, हेदेखील कळू द्यावं" या शब्दात राणेंना बोलण्यासाठी निमंत्रणच दिलंय.
तसंच बबनराव घोलप यांच्या विषयी बोलतांना नेमका निवडणुकीपूर्वीच हा निकाल कसा लागला असा सवाल त्यांनी सरकारला विचारालाय. जर घोलप दोषी आहेत तर मग अजून पद्मसिंह पाटील यांच्या केसचा निकाल का लागला नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शिवाय अशोक चव्हाण, तटकर, भुजबळ आणि अजित पवारांवरील घोटाळ्यांच्या आरोपांची चौकशी कधी होणार असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय आणि नरेंद्र मोदींचा चेहरा आणि महायुतीची सत्ता केंद्रात स्थापन होणारच हा विश्वास दर्शविला आहे.
काँग्रेसची स्थिती फारच गंभीर असून त्यांच्याकडे चेहराच नसल्याचंही त्यांनी म्हटलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक आहे, याबबत विचारलं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब सतत सोबत आहेत, ते नाहीत असं वाटतच नाही, असं ते म्हणाले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.