www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ठाकरे बंधुंच्या टीका टिप्पणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही रान पेटवलेले असतानाच, वडे आणि चिकन सूपवाल्यांना यावर पाणी ओतून जणू काँग्रेस-राष्ट्रवादीस मदत करायची आहे, अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा "सामना`तून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. शिवसेनेची विजयी घोडदौड रोखण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने हा सापळा रचला असून "तुमच्या भाऊबंदकीचे खेळ तुमच्यापाशी`, आम्ही "भावबंधन` व "शिवबंधन`वाले आहोत, असे सांगत आपल्याला या भाऊबंदकीच्या राजकारणात रस नसल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले.
डोंबिवलीतील सभेदरम्यान राज ठाकरे यांनी भावनिक उत्तर दिले होते. बाळासाहेबांच्या आजारपणात त्यांची कशी काळजी घेतली, उद्धव आजारी असतानाही आपले कर्तव्य कसे पार पाडले, या वैयक्तिक स्वरूपाच्या गोष्टी सांगितल्या होत्या.
बाळासाहेबांना शेवटच्या काळात तेलकट वडे दिले जात होते, हे पाहिल्यावर आपण त्यांना चिकन सूप पाठवायला सुरवात केली, असे सांगत त्यांनी मतदारांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला. त्याला गेल्या दोन-तीन दिवसांत उत्तर दिले नव्हते, आज मात्र "सामना`तून जोरदार टीका करून भाऊबंदकीचे राजकारण करत आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या लेखात म्हटले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.