नवाझ शरिफांवरून आव्हाडांनी सेनेला डिवचलं!

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी भारतात येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. पण यामुळे शिवसेनेची मात्र चांगलीच गोची झालीय...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 24, 2014, 03:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी भारतात येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. पण यामुळे शिवसेनेची मात्र चांगलीच गोची झालीय... आणि यावर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनीही सेनेची चांगलीच फिरकी घेतलीय.
‘शिवसेनाप्रमुखांनी पाकिस्तानी खेळाडूंना भारताच्या भूमीवर येण्यास मनाई केली होती. जर आज शिवसेनाप्रमुख असते तर शरीफ यांना दिलेल्या आमंत्रणावर त्यांची काय प्रतिक्रिया असती?’ असा प्रश्न शिवसेनेला नाही तर जितेंद्र आव्हाडांना पडलाय. आपल्या डोक्यातली हे प्रश्न त्यांनी ट्विटरवरून इतरांशी शेअरही केलेत.

नवाज शरीफ यांना निमंत्रण धाडून नरेंद्र मोदींनी एक पाऊल पुढे टाकलं होतं... मोदींच्या या निमंत्रणाला होकार आल्यानं भारत-पाकिस्तान संबंधाची पुढची वाटचाल कशी असू शकते, याची एक झलक पाहायला मिळाली. पण, याच मुद्याचं भांडवल करून आव्हाडांनी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना खिजवण्याचा प्रयत्न केलाय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतात खेळण्यासाठी अनेकदा जाहीर विरोध केला होता. बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीही शिवसेनेची हीच भूमिका पुढे कायम राहिली. पण, लोकसभा निवडणुका भाजपच्या हातात हात घालून लढणाऱ्या शिवसेनेची हीच भूमिका पुढेही कायम राहणार का? असा प्रश्न बहुदा आव्हाडांना पडलेला दिसतोय. आणखी एका ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, ‘कारगील युद्धाला जबाबदार असणाऱ्या नवाझ शरीफ यांच्यासाठी मोदींनी रेड कार्पेटच्या पायघड्या घातल्या आहेत’.

1991 साली वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यावेळी तर शिवसेनेच्या शिवसैनिकांनी खेळपट्टी खणून मुंबईतील पाकिस्तानचा सामना रद्द करायला भाग पाडलं होतं. पण, आता मात्र तेव्हाचे विरोधक आणि आत्ताचे सत्ताधारी सरळ सरळ आपल्याच भूमिकेवर पलटी मारतायत, असं तर आव्हाडांना सूचवायचं नाही ना?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.