भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी-भाजप-मनसेत चुरस

ठाण्यातील भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे अशी तिरंगी लढत होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले कपील पाटील यांच्या कामगिरीकडे अनेकांचं लक्ष असणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 4, 2014, 09:07 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यातील भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे अशी तिरंगी लढत होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले कपील पाटील यांच्या कामगिरीकडे अनेकांचं लक्ष असणार आहे.
सर्वात मोठा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हाची ओळख आहे. २४ आमदार आणि ४ खासदार याच जिल्ह्यातून निवडून येतात. भिवंडी भागात तसे वर्चस्व आतापर्यंत कॉंग्रसचे दिसले आहे. परंतु यावेळी लोकसभेला गणित वेगळे आहे. मनसेने पुणे आणि भिवंडी मतदारसंघात भाजपा समोर उमेदवार दिल्याने या दोन्ही मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
भिवंडीत राष्ट्रवादी ,भाजप आणि मनसे अशी तिरंगी लढत होणार आहे. जवळपास या मतदारसंघात १६ लाख मतदार आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांचे काम ग्रामीण भागात चांगले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न यांना चांगले हाताळता येतात . कुणबी सेनेचे ते अध्यक्ष आहेत. गेल्या लोकसभेला याच मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून लढले होते. त्यांना ७७ हजार ७६९ एवढी मतं पडली होती. विजय मिळाला नाही मात्र त्यांची ताकद दिसून आली.
या मतदारसंघात कुणबी समाज ३७ टक्के, मुस्लिम मतदार २१ %, आगरी समाज जवळपास १२ ते १३ टक्के आहे. तर बाकीच्या समाजाचे मतदार हे २९ टक्के आहेत. दुसरीकडे विद्यमान खासदार सुरेश टावरे यांचे कॉंग्रेसने तिकीट कापून विश्वनाथ पाटील यांना दिले. त्यामुळे टावरे आणि त्यांचे समर्थक नाराज आहेत. याचा फटका विश्वनाथ पाटील यांना बसू शकतो.
कपिल पाटील यांचे राष्ट्रवादीत चांगले वर्चस्व आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपात उडी मारली. त्यांना तिकीट दिल्यामुळे काही स्थानिक सेना भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक भाजपा नेते नाराज झालेत. पाटील यांनी सरपंचपदापासून ते जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात काय समस्या आहेत त्यांचे काय प्रश्न आहे हे मला चांगले माहित असल्याचं पाटील सांगतात. एकीकडे मोदीची लाट आहे. याचा फायदा तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे काही नेते आणि कार्यकर्ते हे पाटील यांना मदत करू शकतात असा दुहेरी फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे.
मनसेची जादू आणि बाल्यामामा म्हणजेच सुरेश म्हात्रे यांची कामे तसेच स्थानिक उमेदवार अशा जमेच्या बाजू म्हात्रेंच्या आहेत. २००९ मध्ये मनसेला या भागातून १ लाख ७ हजार एवढी मते मिळाली होती. आतापर्यंतचा इतिहास आहे की भिवंडी लोकसभा जो जिंकून येतो तो परत कधीच निवडून येत नाही. भिवंडीतील यंत्रमाग कामगारांचा प्रश्न प्राधान्यानं सोडवणार असल्याचं म्हात्रे सांगतात. या निवडणुकीत अनेकांच्या अस्तित्वाची लढाई आहे. भिवंडीकर कोणाला कौल देतात, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.