www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदींच्या दूरदर्शनवरील मुलाखतीचं प्रकरण आता चांगलचं चिघळत चाललं आहे. हा वाद समोर आल्यानंतर दूरदर्शनचे ‘सीईओ’ जवाहर सरकार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांच्यावर टीका केली आहे.
प्रसार भारतीच्या बोर्डमधील सदस्यांना लिहीलेल्या पत्रात त्यांनी मनिष तिवारींना जबाबदार ठरवलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हवं तसं स्वातंत्र्य दिलं नाही. युवा मंत्री आल्यानंतर त्यांच्याकडून स्वातंत्र्याची आशा होती. मात्र, जुनी परंपरा तोडण्यात तेही अपयशी ठरले, असं जवाहर सरकार यांनी म्हटलंय.
दरम्यान मोदींनीही दूरदर्शनला व्यावसायिक स्वातंत्र्य राखता न आल्याबाबत खेद व्यक्त केला होता. जागतिक प्रेस स्वतंत्र्य दिनाच्या निमित्तानं पत्रकारांना शुभेच्छा देताना मोदींनी, आपल्या देसात राष्ट्रीय टीव्ही चॅनलला आपल्या व्यावसायिक स्वातंत्र्यासाठी धडपड करावी लागणं ही दु:खद गोष्ट असल्याचं म्हटलं होतं. आपल्या लोकशाहीला लागलेला हा एक काळा डाग आहे, असंही मोदींनी यावेळी म्हटलं होतं.
दरम्यान मनिष तिवारींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. सूचना आणि प्रसारण मंत्रालय प्रसार भारतीच्या कोणत्याही कामात ढवळाढवळ करत नाही, असा दावा मनीष तिवारींनी केलाय. इतकंच नाही तर स्वातंत्र्याबद्दल त्यांनी गुजरातच्या पत्रकारांच्या स्वातंत्र्याविषयी चिंता व्यक्त केलीय. गुजरातमध्ये पत्रकारांवर देशद्रोहाची कलमं लावली जातात आणि त्यांना विधानसभेतही प्रवेश दिला जात नाही, असं तिवारी यांनी यावेळी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.