www.24taas.com, झी मीडिया, परभणी
परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला. १९९८चा अपवाद वगळता १९८९ पासून आजतागायत या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय. नेहमीप्रमाणे यंदाही शिवसेना आणि राष्ट्रवादीत सरळ लढत होतेय. या निवडणुकीत मराठा कार्डचं वोटींग महत्वाचं आहे.
मराठवाड्यातला परभणी जिल्हा शिवसेनेचा गड. हाच गड शिवसेनेकडून काबीज करण्यासाठी यंदा राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय भांबळे यांना लोकसभेच्या रणांगणात उतरवलंय. तरुण आणि स्वच्छ प्रतिमा असलेले भांबळे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जातात.त्यामुळंच शिवसेनेचे बंडखोर खासदार गणेश दुधगावकर यांना राष्ट्रवादीचे उंबरठे झिजवूनही उमेदवारी मिळाली नाही.
आता गटातटाच्या राजकारणाला सामोरं जात दगाफटका होणार नाही याची काळजी भांबळे यांना घ्यावी लागणार आहे.. याशिवाय मित्रपक्ष काँग्रेसचे रामप्रसाद बोर्डिकर यांच्याशी असलेलं शत्रुत्व भांबळेंना महागात पडू शकतं... या सगळ्या पार्श्वभूमीवर भूमीपुत्र उमेदवार अशी भावनिक साद ते मतदारांना घालतायत.
तर दुसरीकडे गड कायम ठेवण्यासाठी शिवसेनेनं कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास केलेल्या संजय उर्फ बंडू जाधवांना उमेदवारी दिलीय.. भ्रष्टाचार, महागाई, महिला सुरक्षितता असे मुद्दे प्रचारात मांडले जातायत.
परभणीत जातीय समीकरणंसुद्धा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे... ४० ते ४५ टक्के मराठा समाजाची मतं निर्णायक ठरतात. त्यामुळं आता शिवसेना बालेकिल्ला कायम राखते का की यंदा परिवर्तन होणार का याचा फैसला १६ मेला होईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.