परभणीत ज्ञानोबा गायकवाडांची उमेदवारी रद्द

परभणी जिल्ह्यातील चाटोरी गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या माजी आमदार ज्ञानोबा हरी गायकवाड यांची उमेदवारी जिल्हा सत्र न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे.

Updated: Feb 1, 2012, 01:21 PM IST

www.24taas.com, कल्पना मुंदडा, परभणी

 

परभणी जिल्ह्यातील चाटोरी गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या माजी आमदार ज्ञानोबा हरी गायकवाड यांची उमेदवारी जिल्हा सत्र न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. चाटोरी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानोबा गायकवाड आणि अपक्ष उमेदवार भरत घनदाट यांच्यात चुरशीची लढत रंगली होती. अपक्ष उमेदवार भरत घनदाट यांनी ज्ञानोबा गायकवाड यांच्या उमेदवारी संदर्भात निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांसमोर आक्षेप नोंदवला होता.

 

ज्ञानोबा हरी गायकवाड हे जिल्हा परिषद सदस्य असताना शासकीय निवासस्थानाच्या वापरापोटी पाच लाख ७१ हजार रुपयांची थकबाकीदार होते असा आक्षेप घनदाट यांनी नोंदवला होता. पण निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी भरत घनदाट यांचा आक्षेप फेटाळून लावला त्यानंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. जिल्हा सत्र न्यायधीशांनी निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांचा निर्णय अयोग्य असल्याचा निकाल देत ज्ञानोबा गायकवाड यांची उमेदवारी रद्दबातल ठरवली.

 

 

 

 

 

 

भरत घनदाट हे गंगाखेडचे अपक्ष आमदार सिताराम घनदाट यांचे नातू आहेत.