औरंगाबादेत युतीसमोर 'झेडपी' राखण्याचं आव्हान

मराठवाड्याची राजधानी असलेलं औरंगाबाद शिवसेना भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या बालेकिल्ल्याला गेल्या विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत तडे गेले. आता झेडपी राखण्याचं मोठं आव्हान युतीसमोर आहे.

Updated: Jan 28, 2012, 11:18 PM IST

विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद

 

मराठवाड्याची राजधानी असलेलं औरंगाबाद शिवसेना भाजपचा बालेकिल्ला समजला जातो.  मात्र या बालेकिल्ल्याला गेल्या विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत तडे गेले. आता झेडपी राखण्याचं मोठं आव्हान युतीसमोर आहे.

 

नगरपालिका निवडणुकीत पुरता धुव्वा उडालेल्या शिवसेना भाजप युतीसाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे एक परिक्षाच ठरणार आहे. २००७ च्या झेडपीच्या निवडणुकीत शिवसेनेला २४, भाजपला १०, काँग्रेसला १४ तर राष्ट्रवादीला 11 जागा मिळाल्या होत्या. तर मनसेनं १ जागा जिंकून औरंगाबाद जिल्ह्यात खातं उघडलं. यावेळचं चित्र युतीसाठी काहीसं कठीणच दिसत आहे. नगरपालिकेत आलेल्या अपयशामुळं युतीचे नेते खडबडून जागे झाले आहेत. खासदार चंद्रकांत खैरेंनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गोपीनाथ मुंडेंच्या घरातील फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मराठवाड्याच्या राजधानीत विजय मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळंच नगरपालिकेतल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यासाठी युतीचे नेते सज्ज झालेत.

नगरपालिकेतल्या यशामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विश्वास चांगलाच दुणावला आहे. मात्र दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता कमीच आहे. तरीही काँग्रेस स्वबळावर झेडपीत सत्ता आणेल असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.

 

गेल्यावेळी झेडपीत खातं उघडलेल्या मनसेला यावेळी चांगल्या यशाची अपेक्षा आहे. गेल्या दहा वर्षांपासून औरंगाबाद झेडपीत युतीची सत्ता आहे. हा गड राखण्यासठी युतीच्या नेत्यांना आपसातले हेवेदावे विसरून काम करावं लागणार आहे. ही निवडणूक म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्टच ठरणार आहे.