www.24taas.com, मुंबई
तिकीट नाकारल्यानं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात खासदार प्रिया दत्त समर्थक आक्रमक झालेत. प्रिया दत्त यांच्या ऑफिससमोर समर्थक कृपाशंकर सिंहविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने करतायत.
स्थानिक खासदार असतानाही तिकीट वाटपात मला विश्वासात घेण्यात आले नाही. असा आरोप खासदार प्रिया दत्त यांनी केलाय. तसंच खासदारपदाचा राजीनामा देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
दत्त समर्थकांना वॉर्ड क्रमांक 84, 85 आणि 150 मधून उमेदवारी हवी होती. मात्र याठिकाणी दुस-यांना उमेदवारी दिल्यानं हा वाद निर्माण झालाय. कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप करणारे निलंबित काँग्रेस नेते अजित सावंत हे प्रिया दत्त यांच्या भेटीला गेलेत.
खासदार प्रिया दत्त नाराज असल्यास त्यांची समजूत काढू असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलयं. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
तिकीट वाटपानंतर काँग्रेसमध्ये असंतोष थांबता थांबत नाहीये.. अजित सावंतांपाठोपाठ उत्तर मध्य मुंबईच्या खासदार प्रिया दत्त यांनीही कृपाशंकर सिंग यांच्याविरोधात आघाडी उघडलीय. तिकीट वाटपात विश्वासात घेतलं नसल्याचं त्यांचं म्हणणंय. तर त्यांची समजूत काढू, अशी सारवासारव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करतायेत.
या असंतोषात भर म्हणून की काय, काँग्रेसमध्ये पैशांच्या सौदेबाजीच्या आरोपानंतर निलंबित झालेले काँग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत हेही प्रिया दत्त यांना भेटले. मुंबई काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढीस लागली असताना, प्रदेशाध्यक्ष मात्र दत्त यांची समजूत काढू असं सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतायेत.
खासदारकीचा राजीनामा देणार नाही, असं जरी प्रिया दत्त यांनी स्पष्ट केलं असलं..तरी ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधली ही अंतर्गत धसफूस पक्षाला परडवडणारी नाही.. काँग्रेसमध्ये नेत्यांच्या सग्यासोय-यांना झालेलं तिकीट वाटप, पैशांच्या देवाण घेवाणीचे आरोप, प्रस्थापितांना वाढता विरोध यात खासदार प्रिया दत्त यांच्या नाराजीनं हे प्रकरण दिल्ली दरबारी पोहचलाय. या वादावर वेळीच तोडगा काढला नाही तर, शिवसेना-भाजपला सत्तेपासून रोखण्याचा विडा उचललेल्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या मात्तबर नेत्यांना हा संघर्ष निवडणुकांत परवडणारा नाही.