www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मावळ लोकसभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बांधकामे पाडण्याविषयी केलेल्या `त्या` विधानाचा शेकापला जोरदार फटका बसला असल्याचं सांगण्यात येतंय.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम मुख्य मुद्दा ठरला, यानंतर निर्माण झालेल्या वातावरणाचा शिवसेनेने पुरेपूर फायदा उठवल्याचे स्पष्टपणे दिसून आले. आता विधानसभेच्या तोंडावर हा विषय पुन्हा पेटण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
मावळच्या लढतीत अनधिकृत बांधकामांचा मुद्दा अग्रणीवर होता. आघाडी सरकारने बांधकामे नियमित करण्याचा विषय रखडवून, ठेवल्याने आमदार लक्ष्मण जगतापांनी आघाडीची उमेदवारी नाकारली. घाटाखालचे गणित आणि आमदार जयंत पाटील यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधातून त्यांनी शेकापची उमेदवारी स्वीकारली.
पाटलांच्या विनंतीनंतर ठाकरेंनी जगतापांना पाठिंबा दिला. मात्र, अनधिकृत बांधकामांविषयी ठाकरेंची भूमिका वेगळी होती, ती त्यांनी जगतापांच्या प्रचारसभेत मांडली. ज्या नागरिकांना घरांसाठी म्हणून बिल्डरांकडून फसवण्यात आले, त्यांच्या घरांना संरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, अन्य अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली पाहिजेत, असे ते म्हणाले.
वास्तविक, पिंपरी-चिंचवडचा अनधिकृत बांधकामांचा प्रश्न वेगळा आहे. येथील बांधकामे गुंठय़ा-दोन गुंठय़ाची जागा घेऊन नागरिकांनीच केली आहेत.
सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, रावेत, वाकड, थेरगाव या भागात मोठय़ा संख्येने अशा घरांमध्ये नागरिक राहतात.
ठाकरे यांनी सभेत `ते` विधान केल्यानंतर तिथेच नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. ऐन निवडणुकीच्या तीन दिवस आधी ठाकरे यांनी अशी भूमिका मांडल्याने तीव्र पडसाद उमटले.
दुसऱ्याच दिवशी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी बांधकामांना हात लावू देणार नाही, अशी स्थानिक रहिवाशांना अपेक्षित भूमिका मांडली.
या मुद्दय़ावरून बरेच मतदान फिरल्याचे मानले जाते. निकालातील आकडेवारीतूनही ते स्पष्ट झाले आहे. आता विधानसभेचे राजकारण सुरू झाले असून त्यातही हा मुद्दा प्रभावी ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.