www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड अभिनेते सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर, लेखक सलीम खान यांनी आपल्या घरी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची उर्दू वेबासाइट लॉन्च केलीय. त्यामुळं आता उर्दूतही `नमो नमो` असेल.
सलीम खान यांनी मोदींची खूप स्तुती केली. ते म्हणाले, गुजरात दंगलीच्या नावानं काय आयुष्यभर रडत राहणार? मोदींच्या छत्रछायेत मुस्लिम समाज सुरक्षित आहे. गुजरात दंगलीबाबत मोदींना क्लीनचिट देत सलमान खानच्या वडील म्हणाले, दुसरा पर्याय काय आहे?
सलीम खान म्हणाले, मला पूर्ण विश्वास आहे की मोदी जोपर्यंत आहे तोपर्यंत कुणी निर्दोष व्यक्ती मरणार नाही. उर्दू भाषेबद्दल म्हणत सलीम खान म्हणाले, ज्याप्रकारे योगाचं नाव एका विशिष्ट्य संप्रदायासोबत जोडला गेलाय तसाच उर्दू भाषेलाही एका धर्मासोबत जोडलंय. उर्दू खूप सुंदर भाषा आहे, ती जिवंत राहायला हवी. एक उर्दू वेबसाईट लॉन्च करणं म्हणजे एक चांगली सुरूवात आहे.
या वेबसाइटमध्ये मोदींची माहिती देण्यात आलीय. मोदींच्या आयुष्यातील संघर्ष आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मिळवलेलं यश याचीही स्तुती वेबसाइटमध्ये आहे. आतापर्यंत 17 भाषांमध्ये मोदींची वेबसाइट लॉन्च झालेली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.