राहुल नार्वेकरांनी घेतली शरद पवारांची भेट!

शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी शरद पवारांची मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नार्वेकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. मात्र, नार्वेकरांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून माघार घेतली होती. त्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्यांच्यावर नाराज आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 16, 2014, 06:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी शरद पवारांची मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नार्वेकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. मात्र, नार्वेकरांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून माघार घेतली होती. त्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्यांच्यावर नाराज आहे.
नार्वेकरांच्या अर्ज मागे घेण्यामागे कोण अशी चर्चा राजकीय विश्वात रंगली होती. आता राहुल नार्वेकर शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीच्या वाटेवर असण्याची शक्यता आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर नार्वेकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनीही त्यास दुजोरा दिला.
इतकेच नव्हे तर, नार्वेकर यांच्याशी गेल्या तीन आठवड्यांपासून संपर्कात असल्याचे पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे नार्वेकर यांच्या पक्षांतराच्या चर्चेला बळकटी आली आहे. राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत. ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांना मावळमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जाते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत मावळचे विद्यमान खासदार गजानन बाबर, परभणीचे खासदार गणेश दुधगावकर, युवा नेते अभिजित पानसे यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. शिवसेनेतले अनेक नाराज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर असून याबाबत अजित पवारांसोबत अनेकांच्या भेटीही झाल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला color="blue">फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.