www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणूक 2016चे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यालयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांमधला उत्साह तर खूप वाढलेला दिसतोय. कारण ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना यंदा मतदारांनी सोडलंय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर झालेली ही पहिली निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस या निवडणुकीत लागला होता. त्यातच शिवसेनेतून कधी काळी बाहेर पडलेले वा हकालपट्टी झालेले अनेक दिग्गज नेते शिवसेनेविरोधात शड्डू ठोकून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्यांचा दारूण पराभव झालाय.
कोण-कोण आहेत हे नेते पाहा
> नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेसमोर कडवं आव्हान उभं केलं होतं. मात्र, सेनेच्या हेमंत गोडसे यांनी भुजबळ यांना लाखांपेक्षाही अधिक मताधिक्यानं धूळ चारली.
> रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये एकेकाळचे शिवसेना नेते नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे हे रिंगणात होते. त्यांच्याविरोधातील लढत शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नीलेश राणे यांचा पराभव करून सेनेची प्रतिष्ठा कायम राखली.
> ठाणे-बेलापूर पट्ट्यात गणेश नाईक यांचं मोठं साम्राज्य आहे. यावेळी मात्र या साम्राज्याला हादरा देण्यात शिवसेनेला यश मिळालं. नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांचा दणदणीत पराभव करत सेनेच्या राजन विचारे यांनी ठाण्याच्या गडावर भगवा फडकवला.
> राज ठाकरे यांच्या मनसेने शिवसेनेसमोर खरी अडचण निर्माण केली होती. मनसेनं फक्त शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उतरवले होते. तसंच नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देऊन महायुतीच्या मतदारांच्या मनातही संभ्रम निर्माण केला होता. मात्र, शिवसैनिकांनी मनसेचा हा डाव हाणून पाडला. राज ठाकरे यांच्या मनसेला राज्यात एकही जागा मिळवता आली नाही.
> मनसेचे आमदार आणि मनसेचे दक्षिण मुंबईतील उमेदवार बाळा नांदगावकर यांनाही पराभवाचा धक्का बसलाय. नांदगावकरही मनसे आधी शिवसेनेतच होते.
> शिरूर मतदारसंघातून उभे असलेले अशोक खांडेभराड यांनी नुकताच शिवसेनेला रामराम ठोकला होता. मात्र त्यांचा दारूण पराभव झालाय.
> काँग्रेसचे संजय निरुपम यांनाही पराभवाची चव चाखावी लागलीय. त्यांनी सुद्धा शिवसेना सोडली होती.
> काँग्रेस / राष्ट्रवादीकडून बुलडाण्याचे कृष्णराव इंगळे रिंगणात होते. मात्र त्यांना शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्याकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. इंगळेही आधी शिवसेनेतच होते.
> राहुल नार्वेकर यांनी तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडली. मात्र मावळच्या जनतेनं त्यांनाही नाकारालं.
> शिर्डीचे काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनाही पराभव स्वीकारावा लागला. ऐन वेळी उमेदवारी मिळालेले शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी चांगलाच विजय मिळवला. वाकचौरेही सेनेतून काँग्रेसमध्ये गेले होते.
> डोंबिवलीचे खासदार आनंद परांजपे यांनी शिवसेना सोडत राष्ट्रवादी काँग्रेसची कास धरली. मात्र डोंबिवलीकरांनी त्यांनाही परतवून लावलं.
> अभिजित पानसे हा तर शिवसेनेचा युवा चेहरा. मात्र त्यानं शिवसेना सोडून मनसेत प्रवेश केला आणि ठाणे मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. पण पानसेंनाही पराभव स्वीकारावा लागला.
> याच यादीतील आणखी एक नाव म्हणजे पुण्याचे मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे... पुण्यात अनिल शिरोळेंकडून त्यांना दारूण पराभव स्वीकारावा लागला. पायगुडेंनीही नुकताच मनसेत प्रवेश केला होता.
या नेत्यांचा झालेला पराभव शिवसेना सोडणाऱ्यांसाठी चांगलाच धडा असल्याचं बोललं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.