www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुका टप्प्याटप्प्यानं सुरु झाल्यात... महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक तीन टप्प्यांत पार पडणार आहेत. यादरम्यान राज्यात तीन टप्प्यांत ड्राय डे घोषित करण्यात आलाय.
खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं हे पाऊल उचललंय. यानुसार, ज्या मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडणार असेल तिथं निवडणूक प्रक्रिया संपण्याच्या ४८ तास आधी मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे, साहजिकच राज्यातील तळीरामांची आणि तळीरामांच्या नेत्यांची पंचाईत होणार आहे.
महाराष्ट्रात, १० एप्रिल, १७ एप्रिल आणि २४ एप्रिल अशा तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. निवडणूक कालावधीत मद्याचे आमिष दाखवून मतदारांची दिशाभूल करण्याचाही अनेक ठिकाणी प्रयत्न केला जातो. अशा घटना टाळण्यासाठी निवडणूक आयोगानं `ड्राय डे` घोषित केलाय.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व १0 मतदारसंघातील मतदान आटोपणार असून ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून याठिकाणी `ड्राय डे`ला सुरूवात होईल. तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील १९ मतदारसंघांमध्ये दुसर्या टप्प्यात मतदान होणार आहे. तिथे १५ एप्रिलच्या सायंकाळी सात वाजल्यापासून मद्यविक्रीस बंदी असणार आहे. तिसर्या आणि अंतिम टप्प्याच्या मतदानात मुंबई-कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील १९ मतदारसंघांचा समावेश असून तिथे २२ एप्रिलला सायंकाळी सात वाजल्यापासून `ड्राय डे` ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
`ड्राय डे` असताना मद्यविक्री करणाऱ्या दुकानांचे परवाने रद्द होतील, अशी कडक भूमिका निवडणूक आयोगानं घेतलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.