अण्णांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी

बाबा आढाव अण्णांच्या संदर्भात रोज नव्या नव्या स्वरुपात मांडणी होत आहे. अण्णांचे नेमकेपण काय आहे त्याचा शोध घेण्यात येतो. सध्या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी पाहता तर त्यात गैर काहीच नाही.

Updated: Oct 22, 2011, 03:15 PM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

 

बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्ते

 

अण्णांच्या संदर्भात रोज नव्या नव्या स्वरुपात मांडणी होत आहे. अण्णांचे नेमकेपण काय आहे त्याचा शोध घेण्यात येतो. सध्या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी पाहता तर त्यात गैर काहीच नाही.

 

टीम अण्णाचे मुख्य शिलेदार असलेले अरविंद केजरीवाल हरियाणाचे असल्याने अण्णांनी हरियाणातील पोटनिवडणुकीत संदर्भात राजकीय भूमिका घेतली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. खरतरं एका पोटनिवडणुकीच्या संदर्भात अण्णांनी लक्ष घालणं तितकसं योग्य वाटत नाही. अण्णांचा निर्णय परिस्थितीला धरुन नाही. अण्णांनी या पोटनिवडणुकीबाबत घेतलेल्या भूमिकेसंदर्भात लोकपाल विधेयकाला होत असलेल्या दिरंगाईचे कारण दिले आहे. पण लोकपालातील तीन अटींना संसदेने तत्वत: मान्यता दिली आहे. तसेच अण्णांना विनंतीही केली आहे. संसदेत लवकरच लोकपाल विधेयक मांडलं जाणार आहे आणि त्या बाबतीत अण्णांनी थोडी वाट पाहिली पाहिजे. अण्णांनी राजकीय भूमिका घेतलीय. ते राजकारणाच्या जवळ गेलेत त्यात गैर काहीच नाही, पण याबाबतीत त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

 

अण्णांना आता आपल्या प्रभावाची जाणीव झाली आहे. ते आता परिस्थितीची चाचपणी करीत आहेत असं वाटते आहे. अण्णांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ असलेल्या जनमताच्या रेट्याबद्दल दुमत नाही, पण हे समर्थन एकट्या अण्णा हजारेंना आहे का हे तपासलं पाहिजे. पण भारतीय मानस हे फार वेगळं आहे. भारतीय जनमानसाच्या नीतीमत्तेच्या कल्पना वेगळ्या आहेत आणि त्याबाबतीत ते आग्रही आहे. त्यामुळेच १९७७ साली इंदिरा गांधी पराभूत होतील असं मला स्वतःला कारागृहात जाणवलं होतं. भारतीय ग्रामीण जनता समंजस आहे आणि त्यांच्या ठायी ग्रामीण शहाणपणही खूप आहे. त्यामुळेच त्यांनी आणीबाणीच्या विरोधात मतदान केलं.

 

आज देशात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि देशाची अर्थव्यवस्था मुक्त नव्हे तर मोकाट सुटलीय. भ्रष्टाचाराबद्दल जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. अण्णांनी गेली ३० वर्षे भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज सातत्याने उठवलाय. समाजातली नैतिकता लयाला गेलीय. पण अण्णांच्या आंदोलनात समाजजीवनात नितीमत्तेचे अधिष्ठान निर्माण होईल यासाठी कोणताही कार्यक्रम नव्हता. गांधींजीनी याबाबतीत ग्रामसफाई, खादी, सुतकताई यासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातुन समाजातील नितीमत्तेच्या संवर्धनाला प्राधान्य दिलं.

 

अण्णांचे आंदोलन मात्र सामुहिक होऊ शकलेलं नाही त्याची निर्णय प्रक्रिया आपल्या ताब्यात राहिली पाहिजे असं अण्णांना वाटतं असं माझं मत आहे. याचं कारण कदाचित अण्णा लष्करात होते हे असु शकतं. अर्थात अण्णा सरळ साधा देव माणुस आहे याबाबतीत माझ्या मनात संदेह नाही. अण्णांच्या साधेपणामुळेच सामान्य जनतेने त्यांच्यात भ्रष्टाराच्या विरोधातल्या लढाईत प्रतीक शोधलं. आज भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकभावना तीव्र आहे. सरकार हतबल झालंय. अण्णांच्या मागे असलेल्या जनशक्तीच्या अंदाज सरकारला आला नाही. सरकार अण्णांना दुर्लक्षित करु शकतात पण जनशक्तीला करु शकणार नाही. आज या निर्णायक क्षणी भ्रष्टाचार निपटुन काढण्याचा निर्धार सरकारमध्ये दिसुन येत नाही.

 

आज सार्वजनिक जीवनात गांधींजींच्या काळात असलेली पारदर्शकता दिसुन येत नाही. अजितदादा पवारांनी उघडपणे मंत्र्यांना उद्योग असणं गैर काय आहे असं जाहीर पणे म्हटलाय. त्यामुळेच आज उद्योगपती लोकसभा आणि राज्यसभेवर निवडून येतात . संपत्तीचे केंद्रीकरण झालाय आणि हे उद्योजक आपल्या हितसंबंधाचे संपत्तीचे रक्षण करण्याचं काम निवडून गेल्यावर करतात. माझी मीडियाला विनंती आहे की सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराच्या विरोधातील भावना अभिव्यक्त व्हायला पाहिजेत. आणीबाणीच्या आंदोलनात सामान्य माणसाच्या हाताला काहीच लागलं नाही आता परत त्याचीच पुनरावृत्ती होईल अशी भीती वाटतेय.

 

नरेंद्र मोदींच्या संदर्भात अण्णा भूमिका घेत नाही या आक्षेपा संदर्भात मला असं वाटतं की या अण्णांच्या बाबतीत आपल्या अपेक्षा आहेत. अण्णा हे साधं व्यक्तीमत्व आहे त्यांचा वकुब सामान्य आहे त्यांच्या ठायी ग्रामीण शहाणपण आहे एवढचं. अण्णांच्या स्वभावात अहंकार हा दोष आहे हे नाकारता येणार नाही. पण भाजपाने त्यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर दिलीय याबाबतीत मात्र अण्णा फार महत्वाकांक्षी माणुस आहे असं मला वाटत