बोरीवली तर बंद करून दाखवा

राम कदम काँग्रेसचे नेते संजय निरुपम मुंबई बंद करण्याची भाषा करीत आहेत, पण माझे त्यांना उघड उघड आव्हान आहे. ते ज्या ठिकाणी राहतात, त्या बोरिवलीत त्यांनी बंद यशस्वी करून दाखवावा, हे काही नाही, निवडणुकीपूर्वीच स्टंट आहेत.

Updated: Oct 25, 2011, 12:27 PM IST

राम कदम,

आमदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

 

काँग्रेसचे नेते संजय निरुपम मुंबई बंद करण्याची भाषा करीत आहेत, पण माझे त्यांना उघड उघड आव्हान आहे. ते ज्या ठिकाणी राहतात, त्या बोरिवलीत त्यांनी बंद यशस्वी करून दाखवावा, हे काही नाही, निवडणुकीपूर्वीच स्टंट आहेत.

 

मुंबईतील मराठी जनता ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्षाचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरेंच्या बाजूने आहे. आता उरले ते उत्तर भारतीय, तर त्यांची मते खेचण्यासाठी काँग्रेसचा हा डाव आहे.

 

सध्या महाराष्ट्रावर २ लाख कोटींचे कर्ज आहे. राज्यातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सध्या ४९०० मॅगावॅट वीजेची कमतरता आहे. राज्यातील ४२ हजार खेडी ही अंधारात आहेत. अनेक ठिकाणी ६ ते ८ तास भारनियमन केले जात आहे. असे असताना याकडे लक्ष न देता उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद निर्माण करण्याचे काम निरूपमांसारखे काँग्रेसवाले करीत आहेत.

 

ज्या मुंबई, महाराष्ट्राने या उत्तर भारतीयांना आसरा दिला, त्यांच्या छातडावर नाचण्याचे हे काम करीत आहेत. तसेच मुंबईतील वातावरण दुषीत करण्याचे काम करीत असल्याने ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

 

स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्यावे, ही मनसेची आणि मा. अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंची भूमिका आहे. यात गैर काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही ही भूमिका मान्य आहे. त्यांनीही अमेरिकेत रोजगाराच्या संधी जेव्हा निर्माण होतात, त्यावेळी स्थानिकांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात नोकरीची संधी निर्माण झाली, ती उत्तर भारतीय किंवा बिहारी माणसाने बळकावी आणि म्हणावं आमच्यामुळे येथील कारभार चालतात. ही बाब चुकीची आहे.

 

तुम्ही काम करायला येतात, काम करा, पण माज दाखविला, मस्ती केली, अरेरावीची भाषा केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही अरेरावी खपवून घेणार नाही. त्यांना आपली जागा दाखवून देणार हे नक्की.