‘करून दाखवलं’

राहुल शेवाळे उद्धवजींच्या संकल्पनेतून वचननामा सिद्ध केला गेला. त्या वचननाम्यातून आम्ही जनतेला जी कामं करण्याचं वचन दिलं होतं, ती सर्व कामं आम्ही करून दाखवली आहेत. आणि या सर्वाची माहिती लोकांना व्हावी यासाठी करून दाखवलं, हे कॅम्पेन आम्ही चालवलंय.

Updated: Dec 14, 2011, 06:37 PM IST

राहुल शेवाळे, शिवसेना नेते

 

५ वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिका निवडणुकीला शिवसैनिक उभे राहिले ते उद्धवजींच्या नेतृत्त्वाखाली. मनपाच्या निवडणुकीच्या वेळी उद्धवजींच्या संकल्पनेतून वचननामा सिद्ध केला गेला. त्या वचननाम्यातून आम्ही जनतेला जी कामं करण्याचं वचन दिलं होतं, ती सर्व कामं आम्ही करून दाखवली आहेत. आणि या सर्वाची माहिती लोकांना व्हावी यासाठी करून दाखवलं, हे कॅम्पेन आम्ही चालवलंय. यामागे दुसरा कुठलाही उद्देश नाही.

वचननाम्यातली काही वचनं आणि त्यांची पुर्तता-

  • ब्रिटीशकालीन जलवाहिन्या बदलून नव्या जलवाहिन्या बनवल्या.
  • २ भुयारी मार्ग आणि १ उड्डाणपूल बनवला.
  • मनपा शाळांचं नुतनीकरण केलं. व्हर्च्युअल एज्युकेशन सुरू केलं.
  • मनपा शाळांमध्ये २६ वस्तुंचं प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत वाटप केलं.
  • कुलाबा इथे टेंडर मागवली आहेत. माण्याच्या पुनःप्रक्रियेचं काम प्रगतिपथावर आहे.
  • सायन हॉस्पिटल, केईएम रुग्णालय, नायर हॉस्पिटल या ठिकाणी आधुनिक उपकरणं आणली.
  • मुंबईतल्या दवाखान्यांचं काम हाती घेतलं.
  • गोराई इथल्या डंपिंग ग्राऊंडचं शास्त्रोक्त पद्धतीने काम केलं. त्याबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मनपाला मिळाला.
  • देवनार, कांजुरमार्ग याठिकाणच्या डंपिंग ग्राऊंड्ससाठीही तिच उपाययोजना करणार आहोत.
  • मुंबईतल्या २००च्या वर बागांचं सुशोभिकरण केलं, १९ थीम गार्डन्स बनवली.
  • दादरला आंतरराष्ट्रीय दर्जाचं, ऑलिंपिक साईझचा तरण तलाव बनवला.
  • ४५० डांबरी रस्ते बनवले, २०० किलोमीटरचे सिमेंट-काँक्रिटचे रस्ते बनवले.

 

इत्यादी अनेक कामं आम्ही करून दाखवली आहेत. ज्यांना या कामांची माहितीच नाही, त्यांनी ती तपासून पाहावीत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची जी माणसं म्हणतात की ही कामं प्रशासनानं केली आहेत, त्यांनी आठवून पाहावं, की आम्ही या कामांसाठी किती पाठपुरावा केला होता. ते काय म्हणतात की शिवसेनेने कमावून दाखवलं! कमावण्याची कामं काँग्रेस पक्ष करतो. तो कसा, किती खातो हे एव्हाना देशभरातल्या लोकांना माहिती झालंय. त्यामुळे त्यांनी आम्हाला दोष देऊच नये. मुंबईचा विकास करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. आम्ही कामं करून दाखवली आहेत. आणि आम्ही यातून जर काही कमावलं असले, तर ते म्हणजे जनतेचे आशीर्वाद, मुंबईकरांचा विश्वास. खरंतर, काँग्रेस, राष्ट्रवादीलाच मुंबई महानगरपालिकेत निवडून यायचं आहे, ते पैसा कमावण्यासाठी. हे मुंबईकरांनाही चांगलंच ठाऊक आहे. म्हणूनच, यावेळीही शिवसेनाच मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकावेल. जय महाराष्ट्र.