मुंबई : हल्लीच्या फास्ट आणि व्यस्त जीवनशैली तसेच आहाराच्या चुकीच्या सवयी यांमुळे मूळव्याधीची समस्या वाढताना दिसत आहे. मात्र या आजारावर फारसे मोकळेपणाने बोलले जात नाही. वेळेवर उपचार केल्यास मूळव्याध बरा होऊ शकतो.
जिरे - मूळव्याधीवर उत्तम म्हणजे जिरे. भाजलेल्या जिऱ्याची पूड एक ग्लास पाण्यात टाकून हे पाणी प्यायल्यास मूळव्याधीच्या त्रासापासून आराम मिळतो.
गुलाब - मूळव्याधीचा त्रास असल्यास त्यावर गुलाब गुणकारी आहे. १०-१२ गावठी गुलाबाच्या पाकळ्या ५० मिली पाण्यात टाकून ठेवाव्या. सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी प्यायल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो.
दूर्वा - पुजेमध्ये विशेष स्थान असलेल्या दूर्वाही मूळव्याधीचा त्रास कमी करण्यास उपयुक्त ठरतात. २ चमचे दुर्वा कुटून त्या कपभर गायीच्या दुधात उकळून हे मिश्रण गाळून घेतल्यास फायदा होतो.
डाळिंब - मूळव्याधीवर उपचार म्हणून डाळिंबाच्या सालींचाही वापर होतो. डाळिंबाच्या सुकवलेल्या साली अर्धातास पाण्यात भिजत ठेवा. त्या पाण्यात एक चमचा जिरे, पाऊण कप ताक आणि मीठ घाला. हे मिश्रण प्यायल्यास मूळव्याधीचा त्रास दूर होतो.
मुळा - मुळ्याच्या रसात मीठ घालून प्यायल्यास मूळव्याधीचा त्रास बरा होतो.