थंडीचे दिवस सुरू झालेत... गूळ खा, स्वस्थ राहा!

थंडीचे दिवस सुरू झालेत. आपली, आपल्या मुलांची, वृद्ध मातापित्यांच्या तब्येतीची काळजी तुम्हालाही सतावत असेलच ना! मग, त्यांची तब्येत जपण्यासाठी आपण अनेक प्रतिबंधात्मक उपाय करून त्यांची काळजी घेऊ शकतो. यामध्ये एक पदार्थ आपली सर्वात जास्त मदत करू शकतो... तो म्हणजे गूळ.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 16, 2013, 08:14 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
थंडीचे दिवस सुरू झालेत. आपली, आपल्या मुलांची, वृद्ध मातापित्यांच्या तब्येतीची काळजी तुम्हालाही सतावत असेलच ना! मग, त्यांची तब्येत जपण्यासाठी आपण अनेक प्रतिबंधात्मक उपाय करून त्यांची काळजी घेऊ शकतो. यामध्ये एक पदार्थ आपली सर्वात जास्त मदत करू शकतो... तो म्हणजे गूळ.
गोड खाणं कुणाला आवडत नाही. गोड खा, गोड बोला, गूळ दिला नाही तरी चालेल तर गुळासारखं गोड मात्र जरूर बोला, अशी शिकवण आपल्याला लहानपणापासून दिली जाते. कदाचित, याच कारणामुळे आयुर्वेदाच्या जनकांनी पाक, प्राश इत्यादींच्या रुपात आपल्यासाठी अनेक मधुर आणि बलवर्धक औषधं तयार केलीत. याचसाठी आपल्या जीवनात ऊसाच्या महत्त्वाचा अंदाजही आपल्याला येतो. ऊसापासूनच गूळ बनतो हे तर आपल्याला ठाऊकच आहे. हाच गूळ थंडीच्या दिवसांत आपल्या शरीरात एका खास प्रकारची ऊर्जा तयार करतो. यामुळे थंडीच्या दिवसांत थंडीपासून बचावासाठी आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते आणि आपण अनेक प्रकारांच्या आजारापासून मुक्त राहतो.
थंडीच्या दिवसांत आपल्या खाण्यात गूळाचा समावेश असणं आपल्यासाठी फायदेशीर ठरतं. गूळाचं नियमित सेवन केल्यानं सर्दीनं होणाऱ्या आजारांपासून आपण लांब राहू शकतो. आयुर्वेदात म्हणल्याप्रमाणे गूळ लवकर पचतो, शरीरात रक्ताचं प्रमाण वाढवतो आणि भूकही वाढवतो.
आयुर्वेदात गोड रसाला ‘रसराज’ म्हटलं गेलंय. यकृतासंबंधी असलेल्या तक्रारींना दूर करण्यात हा रस मदत करतो. किंबहुना थकला असाल तर हाच रस तुम्हाला त्वरीत ऊर्जा देऊ शकतो. आयुर्वेदात गुळाला ‘औषधीय शर्करा’ म्हणून संबोधलं गेलंय. अपचन दूर करणं, कफ निवारण करणं, शक्तीवर्धक असे अनेक फायदे गुळामुळे शरीराला मिळतात. रोज आल्यासोबत थोडा गूळ खाल्ल्यानं कफ नष्ट होतो. हाच गूळ सुंठासोबत खाल्ल्यानं वातविकार नष्ट होतात.
मग, विचार कसला करताय... तुमच्या आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी लगेचच गुळाचा समावेश तुमच्या आहारात करा...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.