धूम्रपानाला दूर ठेवायचंय... योगासनं करा!

धूम्रपान सोडण्याची इच्छा असलेल्यांना एक हुकमी मार्ग उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे योगासनं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 3, 2013, 07:50 AM IST

www.24taas.com, मुंबई
सुटता सुटत नाही असं व्यसन म्हणजे, धूम्रपान! त्याच्या धुराचा त्रास लोकांनाही आणि आपल्यालाही. धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी विविध उपाय केले जातात. पण आता धूम्रपान सोडण्याची इच्छा असलेल्यांना एक हुकमी मार्ग उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे योगासनं. काही सोपी योगासनं नियमित केली की तुम्ही धूम्रपानाला दूर ठेवण्यात यशस्वी होऊ शकता. मग काय, सज्ज व्हा आणि धूम्रपानाच्या सवयीपेक्षा योगासनाची सवय लावून घ्या…
धूम्रपान सोडण्याचा संकल्प दर वर्षी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आढळतात. भारतामध्ये दरवर्षी धूम्रपानामुळे कॅन्सरची लागण होऊन लाखो लोक मृत्यूमुखी पडतात. हे टाळण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. धूम्रपानविरोधी जाहिराती, सिगारेटच्या पाकीटांवरील चित्रे अशा अनेक उपक्रमांमुळे कितीजणांनी धूम्रपान सोडले, हा तसा संशोधनाचा विषय. बहुतांश चेनस्मोकर्स पाकीटांवरील चित्रे आपल्यासाठी नसल्याच्या अविर्भावात असतात. अनेक सिलिब्रिटीज तर सार्वजनिक ठिकाणी सिगरेट फुंकून कायदेभंग करण्यात पटाईत. अशा प्रतिकूल वातावरणातही धूम्रपान सोडण्याचा संकल्प तडीस नेणारे बहाद्दरही आहेत. या जीवघेण्या सवयीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी योगाभ्यासाची मदत होऊ शकते. म्हणूनच धूम्रपान सोडण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या काही योगप्रकारांविषयी जाणून घ्यायला हवं. ध्यानधारणेचा सर्वात सोपा आणि उपयुक्त प्रकार पुढीलप्रमाणे...
पायांच्या घडय़ा घालून बसा. उजवा हात विष्णू मुद्रेमध्ये ठेवा, तर्जनी आणि मधले बोट दाबून ठेवा आणि इतर बोटांद्वारे नाकपुडय़ांची उघडझाप करा. तर्जनी आणि मधल्या बोटांच्या टोकांचा स्पर्श होईल अशा अवस्थेत डावा हात चिन मुद्रेमध्ये ठेवा. डोळे बंद करून सरळ बसा. एक खोल श्वास घ्या. उजवी नाकपुडी बंद करा. चारपर्यंत आकडे मोजत डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. सोळापर्यंत आकडे मोजत दोन्ही नाकपुडय़ा दाबून ठेवा. आठपर्यंत आकडे मोजत उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. त्यानंतर चारपर्यंत मोजत उजव्या नाकपुडीतून श्वास आत घ्या. सोळापर्यंत आकडे मोजत दोन्ही नाकपुडय़ा दाबून ठेवा. आठपर्यंत मोजत डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. यानंतर एक फेरी पूर्ण होते. अशा प्रकारे पाच फेऱ्यांद्वारे सुरुवात करा. हळूहळू दररोज दहा फेऱ्यांपर्यंत सराव वाढवा. हा योगामधील सर्वात प्रभावशाली प्रकार आहे. यामुळे भावभावनांना आवर घालणे, चेतावेग आणि मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.
व्यसन आटोक्यात आणण्यात आंतरमौनाचा योगप्रकार लाभदायक आहे. यासाठी पायघडय़ा घालून स्थिर बसावे. प्रत्येक ज्ञानेंद्रियाकडे हळूवारपणे लक्ष द्यावे. प्रत्येक ज्ञानेंद्रियापासून मिळणार्या संवेदना ओळखून त्या संवेदनांचे विश्लेषण करावे. मूळ संवेदना, मेंदूकडून त्या संवेदनाचा काढला जाणारा अर्थ, आपली प्रतिक्रिया आणि अखेर चौथ्या टप्प्यामध्ये त्या प्रतिक्रियेपासून दूर होऊन आपला त्या संवेदनेशी कोणताही संबंध नसल्याची कल्पना करावी. अशा प्रकारे पाचही ज्ञानेंद्रियांच्या संवेदनांचा अनुभव घ्यावा. यासाठी साधारणतः २०-३० मिनिटांचा अवधी लागतो. यानंतर डोळे उघडावेत. हा तांत्रिक ध्यानधारणेचा प्रभावी प्रकार आहे. यामुळे वैराग्याची अनुभूती होते. नित्य सरावाने मनावर नियंत्रण मिळून व्यसनाशी लढा देण्यात उपयोग होतो. याशिवाय वीरभद्रासन, उपविस्त कोनासन, डौलासनासारख्या योगप्रकारांमुळे अन्य लाभांशिवाय फुफ्फुसेही सक्षम होतात.

बहुतांश व्यसनांचा संबंध आपल्या रक्तघटकांशी असतो. रक्तातील निकोटीनच्या प्रभावामुळे धूम्रपान सोडणे अवघड जाते, असे निदर्शनास आले आहे. मेंदूतील ठराविक ठिकाणी योगाभ्यासाचा नैसर्गिक प्रभाव पडतो. हा वाईट व्यसनाऐवजी चांगले व्यसन लावून घेण्याचा प्रकार आहे. नियमितपणे प्राणायाम, एकाआड एक नाकपुडय़ांतून श्वासोच्छवास केल्याने चेतावेगावर नियंत्रण प्राप्त होते. कोणत्याही व्यसनावर योगाद्वारे नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या योगप्रकारांऐवजी ठराविक योगप्रकार दररोज नियमितपणे करणे आवश्यक असते. योगाभ्यास करण्याच्या कालावधीमध्ये हळूहळू वाढ करावी.