www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रोजची धावपळ, ऑफिसचं टेन्शन, कामाचा ताण या सगळ्या धबडग्यात बरंच काही राहून जातंय. त्यात कदाचित ‘मूल नाही’ , किंवा ‘मूल आता नको’ याचाही समावेश होतो. याचसंदर्भात `इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रोडक्शन आणि ऍस्पायर` या संस्थेनं एक महत्त्वाचा सर्वे केलाय.
मूल होत नाही, ही समस्या आज ब-याच जोडप्यांची आहे. प्रोफेशन आणि करिअरमागे धावता धावता बदललेली लाईफस्टाईल याला जबाबदार आहे. याचसंदर्भात भारतातल्या ९ शहरांमध्ये जवळपास शंभर डॉक्टर्सनी सर्वे केला. 31 ते 40 वयोगटातल्या 46 टक्के दाम्पत्यांमध्ये वंध्यत्व आढळून येतं. याच वयोगटातली 63 टक्के दांपत्य वंध्यत्वावर उपचार घेतायत. भारतात 10 पैकी एका दाम्पत्याला वंध्यत्वाची समस्या आहे.
वंध्यत्वाची काही मुख्य कारणं या सर्वेमध्ये समोर आलीयत. त्यात प्रामुख्यानं बदलती जीवनशैली, कामाचा ताण, उशिरा होणारी लग्न, फास्ट फूडचं सेवन, अल्कोहोलचं सेवन यांचा समावेश आहे. वंध्यत्वाबाबत तरुण जोडप्यामध्ये जागृती नसल्याचंही आढळून आलंय. वंध्यत्वाबाबत बहुतेक जोडपी मित्र परिवार आणि इंटरनेटवर उपाय शोधत असतात.
थोडीशी काळजी घेतली तर वंध्यत्वाच्या समस्येवर मात करणं शक्य आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मित्रांशी बोलून आणि इंटरनेटवर इतर उपाय शोधत बसण्यापेक्षा थेट डॉक्टरांशी बोला आणि एक आनंदी अनुभव घ्यायला सज्ज व्हा.....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.