१९९३ बॉबस्फोट निकाल : याकूब मेमनची फाशी कायम

१९९३ साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून येणं सुरु झालंय. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं खटल्यातील प्रमुख आरोपी याकूब मेमन याची फाशीची शिक्षा कायम ठेवलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 21, 2013, 12:10 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
१९९३ साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं खटल्यातील प्रमुख आरोपी याकूब मेमन याची फाशीची शिक्षा कायम ठेवलीय.
मुंबई साखळी बॉम्बस्फोटात याकूब यानं महत्त्वाचा भूमिका निभावल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. टाडा कोर्टानं ११ आरोपींना सुनावली होती फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यातील याकूब वगळता इतर दहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. निकाल देण्यास उशीर झाल्यानं १० दोषींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय.

१९९३ च्या बॉम्बस्फोटात टाडा न्यायालयानं ३१ जुलै, २००७ ला संजय दत्तसह १०० आरोपींना शिक्षा सुनावली होती. तर २३ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. फरारी आरोपी टायगर मेमन याचा भाऊ याकूब मेमन याच्यासह ११ आरोपींना फाशीची शिक्षा, २० आरोपींना जन्मठेप तर उर्वरित आरोपींना पाच ते दहा वर्षांची शिक्षा देण्यात आली होती. संजय दत्तला दहशतवादी कृत्याच्या शिक्षेतून सूट मिळाली असली तरी त्याला एके ५६ बंदूक बाळगल्याबद्दल शस्त्रास्त्र कायद्याखाली सहा वर्षोची शिक्षा देण्यात आली होती. फाशी झालेल्या बारापैकी एका आरोपीचे निधन झाले असून, जन्मठेपेच्या वीसपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.