www.24taas.com, नवी दिल्ली
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर आज सकाळी ७ वाजता चार विमानांची टक्कर होण्याची संभाव्य भीषण दुर्घटना सुदैवाने टळली. एका खासगी कंपनीचे विमान कुठलीही पूर्वसूचना न देता विमानतळावरील २९ क्रमांकाच्या धावपट्टीवर उभे राहिल्याने एकच गोंधळ उडाला, पण प्रसंगावधान राखून एअर ट्रॅफिक कंट्रोलर विभागाने स्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
एक खासगी विमान एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाला कुठलीही पूर्वसूचना न देता २९ क्रमांकाच्या धावपट्टीवर अचानक उतरले. याच धावपट्टीवरून काही वेळात जेट एअरवेजचे दिल्ली-दोहा विमान उड्डाण करणार होते. यामुळे खासगी कंपनीच्या विमानाला ताबडतोब धावपट्टी सोडून जाण्याची सूचना एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाने दिली.
पण याच वेळेदरम्यान वेळापत्रकानुसार जेट कंपनीचे चेन्नईहून येणारे विमान २८ क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात येताच एअर कंट्रोल विभागाचे धाबे दणाणले आणि विमानतळावर एकच गोंधळ उडाला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी वैमानिकांना योग्य त्या सूचना देऊन हा अनर्थ टाळला.