लखनऊ : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीला धूळ चारत भाजपनं बाजी मारल्याचं स्पष्ट दिसतंय. भाजपनं उत्तरप्रदेशात स्पष्टपणे बहुमतच मिळवलं नाही तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर सपा-बसपा-काँग्रेसची दाणादाण उडालीय.
अखिलेश यादव यांनी आपल्या मनाप्रमाणे तिकीट वाटप केले. तसेच, काँग्रेससोबत केलेल्या युतीमुळे समाजवादी पार्टीचे नुकसान झाले. काँग्रेसची डागाळलेली प्रतिमेमुळे सपाला फायदा झाला नाही.
उत्तर प्रदेशाच्या राजकारणात यादव कुटुंबातच सत्ता राहिली. वडील, मुलगा, पत्नी, काका, पुतण्या, चुलत भाऊ, वहिणी... यादव कुटुंबातील सगळे नातेवाईक राजकारणात आले. कार्यकर्त्यांना मोठे होऊ दिले नाही. राजकारणातील यादव कुटुबांच्या वंशावळीमुळे लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याची प्रतिक्रिया मतपेटीतून दिसून आली.
शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील वादामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याचा ५० जागांवर परिणाम झाला. अखिलेश यादव यांची प्रतिमा खराब झाली. तर पक्षातूनच अनेक शत्रू बनले. गट-तट पडल्यामुळे एकमेकांना पराभूत करण्यासाठीच प्रयत्न सुरू झाला. त्याचा फायदा भाजपला मिळाला. कार्यकारिणी बदलणे, सायकल चिन्ह अखिलेशकडे जाणे यामुळे संशयाचं वातावरण निर्णाण झालं. मुलायम सिंग आणि शिवपाल यादव यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांनी अखिलेशला स्वीकारले नाही तर अखिलेशला पाठिंबा देणाऱ्यांनी शिवपाल यांना स्वीकारले नाही.
पक्षाचे दोन भाग झाल्यानंतर अखिलेशनं आमदारांच्या संख्याबळावर वडील आणि काकांकडून पक्षाचं नेतृत्व तर हिसकावून घेतलं... पण, प्रचारादरम्यान एक संघटना म्हणून नेते - कार्यकर्ते अपयशी ठरले. प्रत्येक ठिकाणी पक्षाच्या प्रचारासाठी अखिलेश आणि डिंपल पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून उभे राहिले. अमरसिंह सारखे नेतेही पक्षातून बाहेर पडल्यानं सपानं एक मोठा चेहरा गमावला होता. पक्षातल्याच लोकांनी पक्षाला पाडण्याचं काम केलं...
निवडणूक जवळ आल्यानंतर ओबीसीमधील यादव वगळता इतर जातींना अखिलेश यांनी दुर्लक्ष केले. मागास जातीतील मंत्र्यांनाही अखिलेश यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. बेनी प्रसाद वर्मा, अंबिका चौधरी, नारद राय आणि अनेक नेत्यांना नाराज केले.